टिटवाळा: गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 429 हून अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा असतो. मात्र, या पैकी अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होतो.गेल्या काही महिन्यांपासून गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत आहे.
एका महिन्यातत नंतर औषधे येतील तेव्हा या, किंवा बाहेरून औषधे विकत घ्या असे गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी संजय झोपे हे रूग्णांना सांगत आहेत. त्यामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून, गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात अगोदरच सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे 'रोजचे मडे त्याला कोण रडे' असा झाला असून सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
सध्या अवेळी पाऊस पडत असल्याने वातावरण बदल निर्माण झाला असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. परंतु या शासकीय आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांतून नाराजीचा सूर निघत आहे. गोर गरीब आणि अडाणी लोकांचा वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवर भाबडा विश्वास असल्याने अनेकदा आरोग्य यंत्रणे कडून मिळणाऱ्या हीन वागणुकीवर सर्वसामान्य नागरिक बोलत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे फावले असून याबाबत आरोग्य प्रशासन उदासीन असल्याने न मिळणाऱ्या सेवा कधी मिळणार? यासह विविध मूलभूत प्रश्न सुटत नाहीत हे दुर्दैवच आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीजन्य, संसर्गजन्य आजारांवर औषधोपचार केले जातात. बाह्य रुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप यासारख्या साथीजन्य आजारांवरील रुग्णांना तपासून काही औषधे दिली जातात. या शिवाय, एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त रुग्णांनाही या ठिकाणी एआरटी केंद्रातून औषधे पुरविली जातात. रुग्णांवर उपचार सुरू असताना काही वेळा प्रतिजैविके बाहेरून मागविण्यासाठी डॉक्टरांकडून चिठ्ठी दिली जात असल्याचे काही रुग्णांनी सांगितले.
गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये गोळ्या-औषधे आणि तज्ञांचा अभाव असल्याने खाजगी दुकानदाऱ्या बोकाळल्या आहेत. खोखल्याचा औषध संपला आहे मागविण्यात आला आहे मात्र, अद्याप औषधसाठा आलेला नाही. पुढील महिन्यात औषधे येतील तेव्हा या अशा प्रकारचा सल्ला औषध निर्माण अधिकारी करीत आहेत. गोरगरीबांची पिळवणूक प्रकर्षाने समोर आली असली तरी राजकीय व शासकीय यंत्रणा यांना कोणाला काही पडले नसल्याचे अधोरेखित होत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नाही. तरीही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. हे वास्तव समोर असले तरी शासकीय यंत्रणा कोणत्याही पातळीवर पर्यायी व्यवस्था करत नाही.
स्थानिक आरोग्य यंत्रणेकडूनऔषधांचा तुटवडा असल्याचे जाहीरपणे रुग्णांना सांगत आहेत. ‘सरकार फक्त घोषणा करते. रुग्णालयांत औषधे उपलब्ध नाहीत.औषधे बाहेरून घ्या, नाही तर एका महिन्यात औषधे येतील असे सांगून गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो,’ असे सुनिल जाधव या रुग्णाने सांगितले.
काही औषधे संपली असून,मागवीली आहेत, ती लवकरच उपलब्ध होती. औषध निर्माण अधिकारी यांनी अस बोलायला नको होत.
योगेश कापूसकर, वैद्यकीय अधिकारी, गोवेली, प्रा,आ, केंद्र.