ठाणे : चरस आणि एमडी पावडर ड्रग्जची विक्री करणाऱ्या मिलिंद जगदंबाप्रसाद दुबे (वय ४२, रा.वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विकास घाेडके यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून एम.डी. व चरस, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा आणि मोटारसायकल असा तीन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वागळे परिसरातील संभाजीनगर नाल्याजवळ एक जण ड्रग्जच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटला मिळाली हाेती. त्याच आधारे ८ ऑगस्टला या पथकाने सापळा लावून मिलिंद दुबे याला रात्री ८:३०च्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये २७ ग्रॅम चरस आणि ७० ग्रॅम एमडी पावडर हे अमली पदार्थ आढळले आहेत. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.