जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दारुसाठी पैसे न दिल्याने आपल्या आत्यावरच कोयता आणि चाकूने खूनी हल्ला करणाºया किसन सोमा गंगाडे (३८, रा. लोकमान्यनगर पाडा क्रमांक, ४, ठाणे) या दारुडया भाच्च्याला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी दिली. खूनी हल्ला केल्यानंतर तो स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील लोकमान्यनगर भागात राहणाºया किसन गंगाडे याने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याची ७९ वर्षीय आत्या मैना खांजोडे हिच्याकडे दारू पिण्यासाठी तसेच खचार्साठी पैशांची मागणी केली. ते तिने देण्यास नकार दिला. याच कारणावरून रागाच्या भरात त्याने तिच्यावर कोयता आणि धारदार चाकूने डोक्याच्या मागील भागावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंभाळ होऊन गंभीर जखमी झालेल्या या महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
याप्रकरणी तिच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर कथित आरोपी किसन गंगाडे हा स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याकडील कोयता जप्त करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एच. शिंदे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"