भिवंडी : बहुप्रतीक्षित असलेल्या कोरोना लसीकरणाची ड्राय रन शुक्रवारी घेण्यात आली. भिवंडीतील दिवा अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ड्राय रन पार पडली. यावेळी कोरोना लस देताना घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भातील माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाकडून देण्यात आली. यावेळी तालुक्यातील २५ आशा वर्कर यांना बोलावून हे ड्राय रन पार पाडले असून त्यासंदर्भातील माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यात लहान बालकांसाठी नियमित लसीकरण केले जात असल्याने त्याचा अनुभव आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे कोरोना लस देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार असून ही लस चार टप्प्यात होणार असून या लसीकरणाच्या कोणतीही बाधा अथवा अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल, शहापूर व भिवंडीतील दिवा अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ही ड्राय रन घेण्यात आली. कोरोनावरील लस सुरुवातीला आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार असून त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील पोलीस आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येईल, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती कुंदन पाटील यांनी सांगितले.