लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : धसई - म्हसा रस्त्यावरील दुधनोली येथील पूल मोडकळीस आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुलाच्या बांधकामासाठी मार्च महिन्यात दोन कोटींची तरतूद केली. तसेच ओजिवले येथील पूल देखील कमी उंचीचा असल्याने पावसात तो पाण्याखाली जातो. या दोन्ही पुलांचे बांधकाम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालकांची अडचण होऊ नये यासाठी येथील वाहतूक टोकावडे एकलहरे आणि सरळगाव खेडले धसई या मार्गावरून वळविण्यात आली आहे. तर दुधनोली येथील पूल दुरूस्तीमुळे येथील वाहतूक दुधनोली - बेंडारवाडी ते उमरोली - शिदाची अशी वळवण्यात आली आहे.दुधनोली तसेच ओजिवले या दोन्ही पुलांचे काम गजानन कन्स्ट्रक्शनकडे देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर बांधकामाला परवानगी मिळाल्याने आणि पुलाचे बांधकाम या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असल्याने ठेकेदाराने एप्रिल महिन्यात कामाला सुरुवात केली. मात्र, मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी रेती वाहतुकीस परवानगी देण्यास उशीर लावल्याने पुलाच्या बांधकामास विलंब झाला. दुधनोली येथील पुलाचा स्लॅब आठ दिवसांपूर्वी टाकला, तर ओजिवले पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असून हा पूल महिन्याभराने वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. महिनाभरात स्लॅब टाकून झाला असला तरी त्याला मजबुती येण्यासाठी आणखी दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत. यादरम्यान, वाहन चालकांची अडचण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.दुधनोली येथील मोडकळीस आलेला पूल आणि ओजिवले येथील पूल पाण्याखाली जात असल्याने आ. किसन कथोरे यांनी पुलाच्या बांधकामासाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन दुधनोली पुलासाठी दोन कोटी तर ओजिवले पुलासाठी अडीच कोटीं रुपये निधीची उपलब्धता करून दिली. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार गजानन कन्स्ट्रक्शनला सूचना दिल्या गेल्या. एप्रिल महिन्यात कामाचा शुभारंभ करून, धसई ते म्हसा कर्जत मार्गावरील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण येऊ नये म्हणून अतिशय जलदगतीने काम पूर्ण केले आहे. अशा वेळी मोटार सायकल आणि हलकी वाहने पुलावरून घसरण्याची शक्यता असून त्यामुळे अपघात होण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुधनोली बेंडारवाडी ते उमरोली शिदाची या मार्गाचा वापर काही दिवसांसाठी करून अपघात टाळावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार गजानन कन्स्ट्रक्शनने सूचना दिल्या असून तसे फलकही पुलावर लावले आहे. तर ओजिवले पुलाचे काम प्रगती पथावर असून हा पुल महीनाभरात वाहतुकीस खुला होण्याची शक्यता उपविभागीय अभियंता एस.डी. महाडिक आणि ठेकेदार दिनेश देशमुख यांनी वर्तवली.
दुधनोली पूल पंधरा दिवसांनी खुला
By admin | Published: June 27, 2017 3:08 AM