डोंबिवली : मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये डेक्कन एक्स्प्रेस आणि आसनगाव लोकलची टक्कर टळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता घडला असता, पण लोकलच्या मोटरमनला वेळीच डेक्कन एक्स्प्रेसची बोगी दिसल्यामुळे मोठा अपघात टळला. प्रवाशांचे प्राण वाचवणारे मोटरमन आसाराम वर्मा यांचा येथोचित सन्मान केला जावा, अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे.उत्कल एक्स्प्रेसला शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये अपघात झाला होता. १३ डबे रूळांवरून घसरल्याने २२ प्रवाशांचे प्राण गेले. त्याच दिवशी कल्याण स्टेशनजवळ सकाळी अपघात टळला. आसनगाव-सीएसटी जलद लोकलचे मोटरमन आसाराम वर्मा यांनी क्रॉसओव्हर पॉइंटवर उभी असलेल्या डेक्कन एक्स्प्रेसची शेवटची बोगी बघितली आणि त्यांनी तात्काळ ब्रेक लावला. त्यामुळे दोन्ही गाड्यांची संभाव्य टक्कर टळली, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे पदाधिकारी विक्रम सोळंकी यांनी दिली.कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून आसनगाव-सीएसटी जलद लोकल निघाली. ती जलद मार्गावर क्रॉसओव्हर करण्याच्या तयारीत असतानाच सिग्नल क्रमांक १७ हा लाल होता. त्यामुळे काही मीटर अंतरावर वर्मा यांनी लोकल थांबवली. अवघ्या दोन मिनिटांनी सिग्नल पिवळा झाला आणि त्यांनी लोकल पुढे नेली. पण तेवढ्यातच त्यांना क्रॉसओव्हर पॉइंटला डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा डबा दिसला. त्यामुळे तेथे त्यांनी तत्परतेने लोकल थांबवली. मात्र, त्यांनी तसे केले नसते, तर लोकल ट्रेनला धडकलीच असती. सदोष सिग्नलिंग सिस्टममुळे हा प्रकार झाल्याचा दावा सोळंकी यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशीही त्यांची चर्चा झाली आहे. यासंदर्भात त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होइल, असेही सोळंकी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सिग्नल यंत्रणेने सतर्क असावेसोळंकी म्हणाले की, फलाटांची लांबी हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या फलाटात १८ डब्यांपेक्षा जास्त डब्यांची गाडी एकाच वेळी थांबत नाही, तेथे लोकल गाड्यांची वाहतूक का केली जाते. त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.सिग्नल यंत्रणेने सतर्क असायला हवे अन्यथा अपघाताची दाट शक्यता असते. त्यामुळे चौकशीअंती जर ही घटना सत्य असेल तर वर्मा यांच्या सतर्कतेला सलाम करून त्यांचा यथोचित सन्मान करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.- आसनगाव-सीएसटी जलद लोकलचे मोटरमन आसाराम वर्मा यांनी क्रॉसओव्हर पॉइंटवर उभी असलेल्या डेक्कन एक्स्प्रेसची शेवटची बोगी बघितली आणि तात्काळ ब्रेक लावला. त्यामुळे दोन्ही गाड्यांची संभाव्य टक्कर टळली, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे पदाधिकारी विक्रम सोळंकी यांनी दिली.
मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये अपघात टळला? सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:45 AM