पंकज राऊत , बोईसरतारापूर एमआयडीसीमधील बहुसंख्य कंत्राटी कामगारांना मिळालेल्या पुटपुंज्या बोनसमुळे गगनाला भिडलेल्या महागाईत त्यांची दिवाळी मंदीतच जाणार आहे. तर, कायम व कंत्राटी कामगारांना बोनसच्या रकमेचे वाटप हे रोखीने न देता ते चेक किंवा संबंधित कामगारांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात यावे, हा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश तारापूरचे उद्योजक व कंत्राटदार धुडकावून लावत आहेत. तारापूर एमआयडीसीमध्ये बहुसंख्य कंत्राटी कामगारांना बारा तासांची ड्युटी करावी लागत असून शेकडो कामगार तर आठवड्याची सुटी तसेच किमान वेतनापासून वंचित आहेत. बोनसच्या तुटपुंज्या रकमेचे खरे कारण किमान वेतन न मिळणे, हे आहे. बोनसची रक्कम संबंधित कामगारांना चेकने किंवा त्या कामगारांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केल्यास बोनस रक्कम किती दिली, हे खरे वास्तव समोर येईल, या भीतीने उद्योजक व कंत्राटदार बोनस रोख स्वरूपात देतात, तर किती कामगारांना बोनसच्या रकमेचे वाटप चेक किंवा बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले, त्यासंदर्भातील काहीही माहिती तारापूर येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तारापूर एमआयडीसीमधील बहुसंख्य उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांचा वापर होत असून त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के कंत्राटी कामगार हे तारापूर येथील सतत वेगवेगळ्या उद्योगांत काम करतात किंवा परराज्यांत निघून जातात. त्यामुळे अशा हजारो कंत्राटी कामगारांच्या नशिबी बोनस कधीच नसतो. त्याचा फायदा मालक व कंत्राटदारांना होत असतो. कामगार कायद्यासंदर्भातील बहुसंख्य नियम पायदळी तुडवून मालक व कंत्राटदार कंत्राटी कामगारांची पिळवणूक करून गडगंज नफा कमावतात, परंतु बोनस अॅक्टनुसार किमान ८.३३ टक्के बोनस देऊन बोनस दिल्याच्या फुशारक्या मारतात. वास्तविक पाहता ज्या उद्योगांना नफा झाला आहे, त्यांनी तरी जास्तीतजास्त टक्के बोनस द्यावा, ही सर्वसाधारण कंत्राटी कामगारांची माफक अपेक्षा असते. परंतु, तीही अपेक्षा पूर्ण केली जात नाही, ही खरी शोकांतिका आहे.
कंत्राटी कामगारांची दिवाळी तुटपुंज्या बोनसमुळे मंदीतच!
By admin | Published: November 10, 2015 12:13 AM