ठाणे : आज व्यस्तता इतकी वाढली की, नट तालमीला नाही तर थेट रंगीत तालमीला येतात. त्यांनी प्रेक्षकांना गृहीत धरलेलेल असते अशी खंत नाटककार संजय पवार यांनी व्यक्त केलीमहाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘रंगभूमी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. पवार पुढे म्हणाले की, नाटक हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. सुरूवातीला लोकपरंपरेत शब्द इतके महत्त्वाचे नव्हते. मग नाटक आल्यावर शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. मौखीक परंपरेतून नाटक विकसीत झाले. आपण या टप्प्यावर आलो तरी नाटक बाबत फार सकारात्मक बोलले जात नाही. नाटक ही लाईव्ह कला आहे, थेट संवादाची कला आहे. चित्रपट दिग्दर्शनाचे माध्यम आहे तसे नाटक हे लेखनाचे माध्यम आहे. त्यामुळे नाटकात लेखकाला महत्त्व आहे. पुर्वी नाटकाला साहित्य म्हणायचे की नाही इथून सुरूवात झाली. १९८० साल सुरू व्हायच्या आसपास आपल्याकडे वेगवेगळी मासिके होती आणि यात नाटकाबद्दल भरपूर समिक्षा येत होती. १९८० नंतर ज्या संहिता आणि प्रयोग पुढे आले त्याची समिक्षा झाली आणि ज्याला समिक्षा माहिती आहे त्याला आता लिहून दिले जात नाही असेही पवार म्हणाले. दिग्दर्शक रविंद्र लाखे म्हणाले की, नाटककार आणि दिग्दर्शक संघर्ष नसला तरी अभिनेता आणि दिग्दर्शक असा संघर्ष असतो आणि तो संघर्ष बराच वेळा गुप्त असतो. जसे नृत्य आणि गायनात गुरूंकडे १२ वर्षे साधना केल्याशिवाय त्या शिष्याला सादरीकरण करुन देत नाही तसे नाटकाबाबत होणे गरजेचे आहे. पुर्वी नाटक कंपन्या कमी होत्या आणि त्यांचे दिग्दर्शक ठरलेलेल होते आणि त्याकाळी दिग्दर्शकाच्या नावावर नाटक पाहिले जात होते. परंतू आता दिग्दर्शकही खूप आहेत आणि नाटक कंपन्याही खूप आहेत म्हणून कदाचित दिग्दर्शकाचे नाव घेतले जात नाही असे मत लाखे यांनी मांडले. सिनेनाट्य अभ्यासक नितीन आरेकर म्हणाले की, चांगली नाटक - वाईट नाटक असा प्रकार नसतो. नाटकाचा प्रयोग चांगला - वाईट असू शकतो. चांगल्या नाटकांना प्रेक्षक येतात आणि येतही नाही, पण प्रेक्षक येत नाही हे जास्त खरे आहे. प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी शिक्षीत करावे लागते ते आपण केले नाही. नाटक निर्माण करताना अनेक कला, संहिता, सादरीकरण ताकदवान असावी लागते. आजची नाटक करणारी मंडळींचा विचार केला तर साचेबद्ध नाटक केले जाते अशी खंत आरेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, कवी अशोक बागवे यांनी आपले मत मांडले की, नाटकांची संहिता, दिग्दर्शन, अभिनीत ध्वनी, प्रेक्षकांवरचा परिणाम हे नाटकाच्या समिक्षेत येत नाही. समिक्षकाने समिक्षा लिहीताना सखोल अभ्यास करावा, समान डोळ््यांनी पाहणे म्हणजे समिक्षा पण तसे होत नाही अशी खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, नाटकांचे प्रकार समिक्षकाला माहिती हवे आणि कशावर समिक्षा लिहायची हे ठरवले पाहिजे. म्हणजेच समिक्षक हा ज्ञानी असावा अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. वृषाली विनायक यांनी अनेक प्रश्न विचारुन बोलते केले.
व्यस्ततेमुळे नट तालमीला नाही तर थेट रंगीत तालमीला येतात : संजय पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 4:44 PM
महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आयोजित मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘रंगभूमी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर चर्चासत्र रंगले होते.
ठळक मुद्देव्यस्ततेमुळे नट तालमीला नाही तर थेट रंगीत तालमीला येतात : संजय पवाररंगभूमी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर चर्चासत्र संपन्नमहाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आयोजित चर्चासत्र