ठाणे : दिव्यात शहरप्रमुख तथा उपमहापौर रमाकांत मढवी आणि उपशहर तथा नगरसेवक शैलेश पाटील यांच्यात मुंब्रा कॉलनी विभागप्रमुखपदावरून चांगलीच जुंपल्याचे फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे. त्यातच, शिवसेना पक्षप्रमुखांकडून जाहीर झालेल्या दिवा शहरातील विभागप्रमुखांच्या नियुक्त्या डावलून दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी स्वत:च्या भावाची मुंब्रादेवी कॉलनी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचा आरोप करून नाराज झालेल्या पाटील यांनी मढवी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावल्याची चर्चा दिव्यात चांगलीच रंगली आहे.
मुंब्रादेवी कॉलनी विभागप्रमुखपदी नगरसेवक पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते भालचंद्र भगत यांची नियुक्ती मातोश्रीवरून जाहीर झालेली असताना पक्षाचा निर्णय डावलून मढवी यांनी मनमानी करून आपल्याच भावाला या भागात विभागप्रमुख केल्याचा आरोप पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मढवी शिवसेनेत नव्याने आलेल्यांना चांगली वागणूक देत नसल्याने त्याचा परिणाम पक्षवाढीवर होत असून दिव्यातील नगरसेवक पाटील यांच्यासह पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम ते करत असल्याचे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. मढवी हे उपमहापौर असून तेच शिवसेना शहरप्रमुख असल्याने त्यांचा दिव्यात मनमानी कारभार चालत असल्याचा गंभीर आरोप नव्याने शिवसेनेत दाखल झालेले कार्यकर्ते करत आहेत. एकीकडे भगत यांच्या नावाची घोषणा झालेली असताना अचानक त्यांनी आपल्याच भावाची ही नियुक्ती कशी केली, असा सवाल पाटील समर्थकांना पडला आहे. त्यातूनच ही पोस्ट व्हायरल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
घरात पदे वाटण्यापेक्षा कार्यकर्त्यांना न्याय द्यावापदे जाहीर झाल्यानंतर मढवी यांनी परस्पर निर्णय घेऊन त्यांच्या भावाला विभागप्रमुखपदी नियुक्त केले आहे. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ती पोस्ट टाकली आहे. कार्यकर्त्यांसाठी मी माझ्या नगरसेवक, उपशहर आणि प्रभाग समिती अध्यक्ष तसेच स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देईल. उपमहापौर यांनी स्वत:च्या घरात पदेवाटप करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. याबाबत, वरिष्ठांशी बोलून उद्या निर्णय घेईल. - शैलेश पाटील, नगरसेवक
अद्यापही नियुक्तीपत्र दिलेले नाहीमी बाहेरगावी असल्याने शैलेश पाटील यांच्याशी बोलणे झालेले नाही. उद्या दिव्यात आल्यावर त्यांच्याशी बोलेल. तर, पाटील यांच्याकडे बरीच पदे आहेत. त्यातच, अद्यापही कोणाला नियुक्तीपत्र दिलेले नाही. व्हायरल झालेली पोस्ट ही पाटील यांनी टाकलेली नसून त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाकलेली आहे. त्याचबरोबर दिव्यातील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील. - रमाकांत मढवी, उपमहापौर, शहरप्रमुख दिवा