स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - कोरोना काळात ज्याप्रमाणे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले, त्याचप्रमाणे २०२०-२१ या वर्षात ठाणे जिल्ह्यात नेत्रदानाचे प्रमाणही अगदी अतिअत्यल्प झाले आहे. कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या ठाणेकरांनी नेत्रदानाकडे गेल्या वर्षात पुरती पाठ फिरवली आहे. नेत्रदानाची इच्छा अनेकांची असते. नेत्रदानाबाबत गेल्या काही वर्षात ठाण्यात चांगली जागृती झाली होती. २०१९-२० या वर्षात ठाण्यात ४३२ जणांनी नेत्रदानही केले होते; मात्र कोरोनामुळे मार्च २०२० - २१ मध्ये ठाण्यात अगदी नाहीच्या बरोबर म्हणावे इतकेच नेत्रदान झाले आहे.
मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत ठेवून त्याच डोळ्यांनी जग पाहायचे असेल तर नेत्रदानासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. नेत्रहिनांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत विविध स्तरावर जनजागृती केली जाते. त्याचा सकारात्मक परिणाम ठाणे जिल्ह्यात झाला होता. गेल्या काही वर्षात ठाण्यात नेत्रदान करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अनेक जण त्यादृष्टीने नेत्रदानाचे अर्ज भरतातही; मात्र त्या व्यक्तीच्या नातेवाइकांमध्ये मात्र याबाबत अनास्था दिसून येते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक नेत्रदान करण्यास संमती दर्शवत नाहीत. गेल्या वर्षभरात ठाण्यात कोरोनाचा कहर होता. कोरोनाचे अनेक बळी गेलेत. हळूहळू कोरोना कमी झाला; परंतु वर्षभरात ठाण्यात इतरही अनेक नैसर्गिकरीत्या मृत्यू झाले. त्यापैकी काही जणांचे नेत्रदान होऊ शकले असते; मात्र या २०२०-२१ वर्षभरात ठाणे जिल्ह्यात नेत्रदान अतिशय अत्यल्प झाले. व्यक्ती मृत झाल्यावर मृताच्या नातेवाइकांनी जवळील आयबँकेला चार तासाच्या आत कळवल्यास आयबँकेतील डॉक्टर येऊन पुढील प्रक्रिया करतात; मात्र या कोरोना काळात भीतीमुळे ठाणेकरांनी नेत्रदानाबाबत उत्सुकता दाखवली नाही.
--------------
नेत्रदानाबाबत लोकांमध्ये जागृती झालेली आहे; मात्र २०२०-२१ मध्ये ठाण्यात नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण अगदी नाहीच्या बरोबरीने आहे. ही बाब चिंताजनक आहे. रक्तदानाप्रमाणेच नेत्रदानही महत्त्वाचे आहे. नेत्रदान केल्यावर त्याचा कोणताही भाग वाया जात नाही. अनेकदा मृत व्यक्तीची इच्छा असली तरी त्याच्या नातेवाइकांना याची माहिती नसते. तर कोरोनाकाळात हे प्रमाण घटले म्हणजे ठाणेकरांनी भीतीने कोणालाही घरी बोलावण्याची हिंमत दाखवली नाही; परंतु आता येत्या काळात कोरोनाशिवाय जे मृत्यू होतील, त्या मृतांच्या नातेवाइकांनी प्रत्यक्ष नेत्रदानासाठी जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजे.
- डॉ. शुभांगी अंबाडेकर (फेको सर्जन), जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक, ठाणे.
--------------------
डोळ्याशी संबंधित इतर विकार, मोतिबिंदू ऑपरेशन यासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध आहेत. तरी ठाणेकरांनी त्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि नेत्रदानासाठीही मोठ्या संख्येने पुढे यावे.
- डॉ. कैलास पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
---------------------
चौकट
डोळा दान केल्यापासून सात दिवसात नेत्रहिन व्यक्तीवर दृष्टीसाठी कॉर्निआ रिप्लेस करावा लागतो. तर इतर सर्जरीसाठी तो सहा महिन्यांपर्यंत आयबँकेत स्टोअर करता येतो.