लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे यंदाही ठाणेकरांनी घरीच गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यंदा आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन सामाजिक संस्थांनी केले. सणाचा उत्साह रस्त्यावर दिसला नसला तरी सोशल मीडियावर मात्र शुभेच्छांचा वर्षाव दिसून येत होता.
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता घरातच सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाण्यात घरोघरी गुढी उभारून घरातच या सणाचा आंनद लुटण्यात आला.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत दुसऱ्या वर्षीही खंड पडला. तर कळव्याच्या स्वागत यात्रेत यावर्षी खंड पडला. कळवा संस्कृतिक न्यास तथा गावदेवी कळवण देवी, गुढीपाडवा स्वागत समितीने पाडव्याच्या पूर्वसंध्येला आरोग्याची गुढी उभारण्याचे तसेच पुढील वर्षीचा गुढीपाडवा आनंददायी जावो, असे वाटत असेल तर घरातच सुरक्षित राहण्याचे कळवावासीयांना आवाहन केले. यंदा कोरोनावर मात करून पुढील गुढीपाडवा जोशात साजरा करू, असे गोविंद पाटील म्हणाले.
घरात गुढीपाडवा साजरा केला जात असला तरी कडक लॉकडाऊन लागणार, या भीतीने आज ठाणेकर खरेदीसाठी बाहेर पडले होते आणि आवश्यक वस्तूंची खरेदी करीत होते.