ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात एकीकडे नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली जाते, तर दुसरीकडे रंगवल्लीच्यावतीने भव्यदिव्य रांगोळी काढण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकरांचे आकर्षण ठरलेल्या या भव्यदिव्य रांगोळीला यावेळीही ठाणेकरांना मुकावे लागणार आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी भव्य रांगोळीमध्ये खंड पडणार असल्याचे रांगोळी कलाकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेली १८ वर्षे रंगवल्लीच्यावतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून भव्यदिव्य रांगोळी काढली जाते. ही रांगोळी पाहण्यासाठी हजारो ठाणेकर रसिकांची गर्दी असते. रंगवल्लीने ७५ फुटांपासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती, तर २०१९ मध्ये १८ हजार फुटांची रांगोळी काढण्यात आली. गेले अनेक वर्षे ते गावदेवी मैदानात आपल्या रांगोळीचे प्रदर्शन भरवतात. एक वर्ष ब्रह्मांड परिसरात ही रांगोळी साकारली होती. हजारो किलो रांगोळी, विविध रंगांची संगती आणि शेकडो कलाकारांच्या सहभागाने ही रांगोळी रंगवल्लीचे कलाकार दरवर्षी साकारतात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रांगोळी काढण्यास सुरुवात होते आणि पूर्वसंध्येला त्याचे उद्घाटन केले जाते. पाच दिवस हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असते. रसिकांना या भव्य रांगोळीचा आनंद घेता यावा यासाठी विशिष्ट व्यवस्थाही आयोजकांकडून केली जाते. परंतु गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रंगवल्लीच्या भव्यदिव्य रांगोळीचे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. यंदा रंगवल्लीने रांगोळीसाठी परवानगी मागितली होती. परंतु रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे याही वर्षी इच्छा असताना रंगवल्ली रांगोळी साकारणार नाही. सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु रंगवल्लीची रांगोळी बघायला हजारो रसिकांची गर्दी असते. रसिकच नसतील तर रांगोळी काढून उपयोग नाही. कारण कलाकार हा रसिकांसाठीच कला साकारत असतो, त्यामुळे यंदा भव्य रांगोळी न काढण्याचा निर्णय घेतल्याचे रंगवल्लीचे संस्थापक अध्यक्ष वेद कट्टी यांनी लोकमतला सांगितले. यंदाही भव्य रांगोळी काढण्याची संधी हुकली असल्याने कलाकार मात्र हिरमुसले असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------------
भव्य रांगोळी काढण्यात येणार नसली तरी परंपरा म्हणून छोटी रांगोळी रंगवल्ली काढणार आहे.
----------------------------------------
गालिचा रांगोळी, पारंपरिक रांगोळी, सुलेखन, चिन्हांची रांगोळी, पोट्रेट अशा विविध प्रकारचे रांगोळी प्रकार रंगवल्लीने साकारले आहेत. जितके मोठे मैदान तितकी मोठी रांगोळी काढण्याचा मानस असतो, असे कट्टी म्हणाले.
----------------------------