डोंबिवली : जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती, हे कोणी शोधण्यास निघाले, तर त्याला भारतासमोर नतमस्तक व्हावे लागेल. देश सुपरपॉवर आहे की नाही, हे येत्या काळात फक्त संस्कृतीची क्षमता, यावर ठरणार आहे, असे मत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.
चतुरंग प्रतिष्ठान, डोंबिवलीतर्फे ‘चैत्रपालवी संगीतोत्सव’ हा कार्यक्रम शनिवारी पूर्वेतील सुयोग मंगल कार्यालयात झाला. यावेळी वामन केंद्रे बोलत होते. म्हैसकर फाउंडेशन पुरस्कृत ७५ हजार रुपयांचा चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार पं. दिनकर पणशीकर, तर २५ हजार रुपयांची चतुरंग संगीत शिष्यवृत्ती प्रियंका भिसे यांना प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर निवड समितीचे राम देशपांडे, म्हैसकर फाउंडेशनच्या सुधा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रे म्हणाले, जगातील सर्व धर्मांचे मूळ संगीतात आहे. त्यामुळेच भारतात संगीताचे वैविध्य आहे. आपण आपल्या धर्मात आचरणात संगीताला स्थान दिले आहे. त्यामुळे माणूस विकसित होत जातो. संगीत ही शुद्ध कला आहे. संगीताचा मूळ स्रोत हा निसर्ग आहे. संगीत हे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आपली कला समृद्ध असून, ती जगाच्या पटलावर नेली पाहिजे. आपण केवळ एक मेकांना सांगून समाधान मानतो. गुणीजनांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना शिकवले पाहिजे, त्या कलाकारांना पुढे नेले पाहिजे आणि हेच काम चतुरंग प्रतिष्ठान करत आहे. क्रिएटिव्ह मॅनेजमेंटचे जगातील सर्वांत मोठे विद्यापीठ हे चतुरंग प्रतिष्ठान आहे. संघाचे स्पिरीट काय असते, ते त्या कार्यकर्त्यांकडे पाहून समजते. निसर्गाने दिलेल्या क्षमतेचा वापर समाजाच्या समृद्धीसाठी कसा करायचा, हे या संस्थेने शिकवले आहे. माणसे शोधून काढणे, हे खूप कठीण काम आहे. माणसे उभी करणे, हे त्याहून अधिक कठीण आहे. या संस्थेत कुणीही अध्यक्ष नाही. प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करत आहे.
दरम्यान, यावेळी प्रियंका भिसे यांनी गायन, तर पूर्वा आणेराव यांनी कथ्थक नृत्य सादर केले. तसेच श्रुती सडोलीकर-काटकर यांचेही गायन झाले. तबल्यावर त्यांना स्वप्नील भिसे, शेखर गांधी, विश्वनाथ शिरोडकर, हार्मोनियमवर साथ निनाद जोशी, सीमा शिरोडकर, नगमा श्रेयस गोवत्रीकर आदींनी दिली.