ठाणे : राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत लागू केलेल्या रात्री ते ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे ३१ डिसेंबरचे केलेले प्लॅनिंग अखेर तरुणाईला रद्द करावे लागले. यामुळे तरुणाईच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याची एकीकडे भावना असली, तरी ज्या परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे दुसरीकडे तिचे स्वागत करून कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मंगळवारपासून महानगरपालिका क्षेत्रातही संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या संचारबंदीमुळे अनेक हौशींचे प्लॅनिंग रद्द झाले आहेत.डिसेंबर महिना आला की, महिन्याच्या सुरुवातीपासून ३१ डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन करण्यास सुरुवात होते. महानगरात राहणारी ही तरुणाई या निमित्ताने एखादे फार्म हाउस, समुद्रकिनारी, एखादे रिसॉर्ट किंवा एखादा बंगला बुक करून पार्टीचे आयोजन करतात, परंतु २१ डिसेंबर रोजी राज्य सरकारने रात्रीच्या सांचारबंदीचे आदेश दिले आणि तरुणाईमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
संचारबंदीच्या आदेशामुळे अनेक तरुणांच्या घरातून परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. बाहेर जाणे हे धोक्याचे असून, खबरदारी म्हणून घरातच साजरा करा, असे अनेक कुटुंबाकडून सांगितले जात आहे.