- सुरेश लोखंडेठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१, तर इतर बँकांमध्ये ३३९ शेतकऱ्यांचे खाते आहे. या १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे गाव, संस्थानिहाय प्राप्त याद्यांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे बँका पीककर्ज वाटपात यंदाही मेहरबान झाल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. या योजनेच्या पहिल्या दिवशी दोन हजार ८२६ शेतकऱ्यांची खाती आधार लिंक करून त्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रुपये ३ मार्च २०२०ला जमा करण्याचा विक्रम संबंधित प्रशासनाने केला होता. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अल्पावधीतच या योजनेद्वारे दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. या कर्ज योजनेमुळे मला ३० हजार रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. या योजनेतून थकीत कर्जमाफ झाल्यामुळे आर्थिक विवंचना दूर झाली. यामुळे शासनाचे आभारी आहोत. - रवींद्र लुटे, अघई, ता. शहापूर दरवर्षी प्रामाणिकपणे मी कर्जफेड करीत असतो. ८५ हजारांचे पीककर्ज फेडण्यासाठी मी अन्य व्यक्तींकडून व्याजाने रक्कम घेऊन पीककर्ज भरले आहे; मात्र मला आजपर्यंतही शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालेला नाही. हा तर चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार आहे. - हरिचंद्र बागराव, सोगाव, या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यंदाही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. - जयानंद भारती, लिड बँक, मॅनेजर, ठाणे या कर्जमाफीच्या रकमेसंबंधी प्राप्त तक्रारी सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर समित्या गठीत केल्या होत्या. या तक्रारींमध्ये अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी अधिक होत्या. त्या संबंधित स्थानिक तहसीलदारांना प्राप्त होताच त्यावर लगेच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य झाले आहे. या योजनेद्वारे चाळीस हजारांचे कर्ज माफ झाल्याचे शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील शेतकरी पांडुरंग धानके यांनी स्पष्ट करून शासनाचे आभार मानले, तर ६५ हजारांचे कर्ज माफ झाल्याचे नायकाचापाडा येथील राम आवार यांनी मान्य केले.
कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान, ठाणे जिल्ह्यातील १६ हजार १४० शेतकऱ्यांना मिळाला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:13 AM