- शेफाली परब-पंडितमुंबई : थेट अंतरिक्षापर्यंत झेप घेत महिलांनी आपले कर्तृत्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. मग शालेय वाहन चालक हे आव्हानात्मक क्षेत्र मागे कसे राहील? रात्रपाळीवरून घरी परतणाºया तर कधी महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडणाºया महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी वेबबेस्ड टॅक्सी महिलाचालक पुढे सरसावल्या आहेत. त्याप्रमाणे आता शालेय व्हॅन चालविण्याची जबाबदारीही महिलांनी उचलली आहे. डोंबिवलीतील मनीषा भडकमकर यांच्यामुळे मुलांचे पालक निश्चिंत झाले आहेत.सकाळी साडेसहाची पहिली बॅच. त्यामुळे मुलांना शाळेसाठी उशीर होऊ नये, यासाठी त्यांची पहाटे साडेचार वाजल्यापासूनच धावपळ सुरू होते. त्यांना दोन मुलं. मोठा आठवीत तर धाकटा तिसरीत. पण सासूबार्इंच्या सहकार्यामुळे त्या घराबाहेर पडतात. गेली सात वर्षे रोजची त्यांची ही दिनचर्या.मुलांची आबाळ होऊ नये, त्यांचे बालपण हरवू नये, यासाठी त्यांनी पदवीधर असूनही अनेक संधी नाकारल्या; आणि मग एक दिवस शाळेची व्हॅन चालविण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. संपूर्ण कुटुंब पाठीशी उभे राहिल्याने हे काम करणे शक्य झाल्याचे त्या सांगतात.त्यांनी निवडलेल्या या नवीन क्षेत्रातील खाचखळगे, आव्हानांची ओळख करून घेतल्यानंतर त्यांनी निर्णय पक्का करीत गाडीचे स्टेअरिंग हातात घेतले. पण या क्षेत्रातील त्यांचे गुरू ठरले ते त्यांचे पतीच. ‘त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मी आजपर्यंत या क्षेत्रात तरले,’ असे त्या अभिमानाने सांगतात.धो धो पावसात शाळेची व्हॅन चालविण्याचा पहिला दिवसच आव्हान घेऊन आला होता. मुसळधार पावसात वाहतूककोंडीतून मार्ग काढत मुलांना वेळेत शाळेत व शाळेतून घरी पोहोचविणे हे जिकिरीचे ठरते. पावसाप्रमाणेच दुसरे वाहन चालकही कधी कधी त्रासदायक ठरत असतात. सुरुवातीला रिक्षाचालकांकडूनही त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. आता तेच रिक्षाचालक शाळेची व्हॅन पुढे जायला वाट करून देतात.शालेय विद्यार्थ्यांचे बस व व्हॅनमध्ये लैंगिक शोषण, क्षमतेपेक्षा एका व्हॅनमध्ये जास्त मुले कोंबणे, गाड्या बेधडक चालविणे असे प्रकार घडतात. मात्र आपल्या १२ आसनी व्हॅनमध्ये बाकडे टाकून क्षमतेपेक्षा अधिक मुले कोंबणे त्या कटाक्षाने टाळतात. किती तरी पालक महिला व्हॅनचालक आहे म्हणून आम्ही निश्चिंत असल्याचे आवर्जून सांगतात. तर काही खासकरून महिला व्हॅन चालकांची विचारणा करतात. तसेच जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचेही सहकार्य असतेच. पालक मुले विश्वासाने आपल्या स्वाधीन करतात. ते घरी सुखरूप पोहोचेपर्यंत जबाबदारी आपली असते. न चिडता, न घाबरता, सहनशक्ती ठेवत आपल्या आयुष्याची गाडी आत्मविश्वासाने चालवित राहायची,’ असंही त्या आवर्जून सांगतात.
डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:15 AM