कुमार बडदे
मुंब्रा - शौचालयासाठी गेलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला वीजेचा धक्का बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये निरव शांतता पसरली होती. सदरची घटना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे घडली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.येथील रेतीबंदर भागातील चार नंबर परीसरातील बाळगोपाळ मित्र मंडळातील प्रदिप वळसगे आणि अजय सोनकांबळे दुपारी चार वाजता जवळच असलेल्या शौचालयामध्ये गेले होते. ते तेथून बाहेर येताच जोरदार पाऊस आला. यामुळे दोघे शौचालयाच्या बाजुला असलेल्या आडोशाखाली शौचालयामध्ये गेलेल्या जलवाहिनीच्या लोखंडी पाईपाला हात लावून उभे होते. शौचालयातील टाकीमध्ये पाणी चढवण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटरला जोडलेल्या वीज कनेक्शनमधील वीज प्रवाह पाईपामध्ये परावर्तित झाल्यामुळे जोरदार झटका बसल्याने सोनकांबळे पाईपाला चिकटला. यामुळे गंभीर अवस्थेत पोहचलेल्या सोनकांबळेला उपचारासाठी रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक समाजसेवक बाळा कासार यांनी दिली. सदर शौचालयाच्या देखभालीसाठी कुणीही नसल्यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. प्रसंगवधान राखून वेळीच बाजुला झाल्यामुळे प्रदिपचा जीव वाचला. सदर शौचालयामधील सर्व उपकरणाची तोडफोड झाली आहे. वायर इतरत्र लोंबकळत असल्यामुळे शौचालयात जाणा-यांना जीव मुठीत धरुन तेथे जावे लागते. देखभालीसाठी तेथे कुणीही नसल्यामुळे तेथे नेहमी अस्वच्छता असते. मृत तरुणाच्या कुटुंबात तरुणाच्या कुटुंबाता तो एकमेव कमवता होता. यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनाने अर्थिक मदत करावी अशी मागणी कासार यांनी केली आहे.