लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रवाशांना ठरल्याप्रमाणे सहलीतील ठिकाणे न दाखवता त्रुटीची सेवा देणाऱ्या केसरी टूर्स कंपनीला ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे.अर्जुन फेराओ आणि आशा पाटील यांनी टूर्स कंपनीकडे १७ ते २२ मे २०१६ साठीचे मॉरिशस सहलीचे पॅकेज घेतले होते. कंपनीने पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करून प्रेक्षणीय स्थळे दाखवली. तर, रविवार असल्याने काही स्थळे बंदचे कारण देऊन दाखवली नाहीत. त्यामुळे अर्जुन आणि आशा यांनी केसरी टूर्स कंपनीविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. वेळापत्रकात बदल करण्याच्या अधिकाराबाबत सहलीच्या अटी व शर्तींमध्ये नमूद होते. ते प्रवाशांनी मान्य केल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच काही स्थळे रविवारी बंद असल्याने सर्वांच्या सहमतीने वेळापत्रक रिशफलिंग केले होते. त्याबाबत, कोणीही तक्रार केली नाही. फिडबॅक फॉर्मवर चांगले रिमार्क असून तक्रार नाही, असे कंपनीने सांगितले आहे.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता अर्जुन आणि आशा यांनी सहलीसाठी एप्रिल २०१६ मध्ये एक लाख ६० हजार ७२६ रुपये भरल्याच्या पावत्या मंचात आहेत. सहलीची प्रत कंपनीने त्यांना दिली होती. पाचव्या दिवशी काही स्थळे बंद असल्याने कंपनीने त्या दिवशीचे साइटसीन बदलून दुसऱ्या, तर दुसऱ्या दिवशीचे पाचव्या दिवशी दाखवण्याचे सांगितले. मात्र, त्यातील स्थळेही रविवारी अर्थात पाचव्या दिवशी बंद असल्याने दाखवली नाहीत. रविवारी शॉपिंग मार्केटला गेले, मात्र तेही बंद होते. इतर स्थळे रविवारी आतून नाही, परंतु बाहेरून दाखवणे सहज शक्य असूनही टूर्स कंपनीने ती दाखवली नाहीत. रविवारी बंद असतात, हे माहीत असूनही रिशफलिंग करून त्रुटीची सेवा दिली. असुविधेबाबत दिलगिरीही व्यक्त केली नाही. कोणतीही अतिरिक्त सुविधासुद्धा कंपनीने ग्राहकांना दिली नाही. कंपनीकडे पुरावाच नाहीआपण सर्व स्थळे दाखवल्याचे केसरी टूर्सने सांगितले असले, तरी त्याचा पुरावा मंचासमोर नाही. फिडबॅक फॉर्म चौथ्या दिवशी भरल्याने पाचव्या दिवशीच्या तक्रारी त्यात नमूद नाहीत. त्यामुळे कंपनीने अर्जुन आणि आशा यांना सहलीच्या खर्चाचे ३० हजार आणि तक्रार खर्च मिळून १० हजार देण्याचे आदेश दिले.
त्रुटीची सेवा दिल्यामुळे केसरी टूर्सला १० हजारांचा दंड
By admin | Published: June 01, 2017 5:00 AM