डोंबिवली : शालेय जीवनातील दहावीचे वर्ष शेवटचे...त्यानंतर, मित्रमैत्रिणींच्या आयुष्याच्या वाटा बदलतात... कित्येकांची वर्षानुवर्षे भेटसुद्धा होत नाही... टिळकनगर विद्यामंदिरातील १९७७-७८ मध्ये मॅट्रिक झालेले शालेय मित्रमैत्रिणी ४० वर्षांनी सोशल मीडियामुळे एकत्र आले. शालेय आठवणी, गमतीजमती जपतानाच सामाजिक बांधीलकीतून गरजूंना मदत करण्याचे कार्यही करत आहेत. या ग्रुपने ‘थीम साँग’ तयार केले असून ते सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.
शाळा सोडल्यानंतर शाळा, शाळेतील शिक्षक, मित्रमैत्रिणी, मस्ती, जेवणाचा डबा या सगळ्याच आठवणी मागे पडतात. कुणी संसारात, तर कुणी नोकरी-व्यवसायात गुंतलेले असते. एखाद्या निवांत क्षणी शालेय मित्रमैत्रिणींची आठवण येते, पण इच्छा असूनही त्यांच्याशी गप्पा मारता येत नाहीत. जुन्या आठवणी काढता येत नाहीत. मात्र व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांमुळे असे मित्र एकत्र येत आहेत.
टिळकनगर विद्यामंदिरातील माजी विद्यार्थ्यांनीही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या गु्रपला त्यांनी ‘टीव्हीएम ७८ यू-टर्न’ असे नाव दिले आहे. व्हॉट्सअॅपवरील गु्रपमध्ये ९० जणांचा रोज वर्ग भरतो. गाणी, गप्पागोष्टींचा फड रंगत आहे. तसेच श्रीलंका येथील सफरही केली. या सफरीतच ग्रुपमधील संजय जोगळेकर यांची पत्नी स्वप्ना यांना ग्रुपचे थीम साँग तयार करण्याची संकल्पना सुचली. त्यानंतर, या गु्रपमधील स्वाती लाळे यांनी ‘मौज-मजा, दंगा-मस्ती, ४० वर्षांची जुनी दोस्ती’ ही कविता १० मिनिटांत तयार केली. तर, प्रकाश रायकर यानेही ‘मैत्रेयाच्या नभांगणातील तेजपुंज नक्षत्र जसे व्हॉट्सअॅप केवळ निमित्त, अवघी निखळ मैत्रीची साद खरी, बालमैतरा पुन्हा जोडण्या ओढ उमलते, तीव्र खरी’ हे एक गीत लिहिले. मिलिंद मोहरे या संगीतकाराने या दोन्ही गाण्यांना स्वरबद्ध के ले. ‘मौज मज्जा मस्ती’ हे गीत प्रथम स्वरबद्ध करून त्यानंतर ५० जणांनी स्टुडिओत जाऊन हे गाणे गायले आहे. ऊ र्मिला जोशी यांनी प्रकाश यांचे गाणेही रेकॉर्ड केले. काही दिवसांपूर्वीच ही दोन्ही गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्याचे सर्वांकडून कौतुक होत असून इतरही ग्रुप याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे.
टिळकनगर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी केवळ आठवणींना उजाळा देण्यापुरता या ग्रुपचा उद्देश मर्यादित ठेवलेला नाही, तर सामाजिक बांधीलकीही जपली आहे. एका मुलाला हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वांनी पैसे जमा केले आणि त्या मुलाला नवे आयुष्य दिले.