मीरा रोड - भार्इंदरच्या उत्तन भागात कायद्याने बंदी असलेली हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याने महिलांसह मासेमारी करणारे नाखवा सुद्धा त्रासले आहेत. कारण बोटींवर काम करणारे खलाशी बोटीवर कामासाठी न जाता-या गुत्त्यांकडे वळत असल्याने नाखवांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी दारू माफिया मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून सर्रास पुन्हा आले गुत्ते चालवत आहेत.उत्तन परिसरात हातभट्टीच्या दारू विक्री विरोधात स्थानिक कोळी महिलांनी सतत कारवाईची मागणी चालवली आहे. या विरोधात मोर्चा व बैठका सुध्दा झाल्या आहेत. डॉ. महेश पाटील हे पोलीस अधिक्षक पद असताना त्यांनी हातभट्टीच्या दारु विरोधात धडक मोहिम चालवली होती. मोठ्या प्रमाणात दारुच्या हातभट्या तसेच गुत्ते उद्ध्वस्त केले होते. परंतु पोलीसांची कारवाई काहीशी मंदावल्याचे हेरून हातभट्टीवाले पुन्हा सक्रिय झाले आहेत. उत्तन नाका , नवीखाडी आदी भागात सर्रास हातभट्टीची दारु लहान बाटल्यां मध्ये विकली जात आहे. नवीखाडी येथील हातभट्टी दारू गुत्त्यावर रवीवारी व आज सोमवारी पोलीसांनी कारवाई केली.रविवारी केलेल्या कारवाई हातभट्टीच्या ३६ बाटल्या सापडल्या. तर स्थानिक मच्छीमार नेते मॅल्कम कासुघर यांनी केलेल्या तक्रारीवरून सोमवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हातभट्टीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. डिक नावाच्या चालकास पोलीसांनी अटक केली असुन अन्य एक आरोपी पळून गेला. पहाटे पासूनच हातभट्टीचे गुत्ते सुरु होत असल्याने खलाशी हे बोटीवर कामासाठी न जाता सरळ गुत्त्याकडे वळतात व मद्यपान करुन तर्रर होतात. या मुळे बोटींचे नाखवा त्रासले आहेत. तर गावठीदारु माफियांनी डोके वर काढल्याने महिला वर्ग सुध्दा संतप्त झाला आहे.लोकांनी तक्रार केल्यास पोलीसां कडुन कारवाई होते. पण सदरची कारवाई कुचकामी ठरत असल्याने प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी सांगितले की, पोलिसांची कारवाई सतत सुरु असून, प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा विक्रेत्यांवर करत आहोत. मच्छीमारांनी सुध्दा हातभट्टीच्या दारुस प्रोत्साहन मिळेल अशी कृती करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
उत्तन परिसरात हातभट्टीच्या दारुविक्रीमुळे कोळी महिलांसह बोटींचे नाखवा त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 7:05 PM