ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल ८ तासाहून अधिक यावर चर्चा झाली. युनियनबाजीसह हप्तेखोरीमुळे फेरीवाले वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यातही फेरीवाला समिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी झाली. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करून यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.
या महासभेत यावर कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी फेरीवाल्यांकडून रोज ५०० रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा आरोप केला. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात उशीर झाल्याचे सांगून शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मागणी केली. कारवाई करण्यासाठी जात असताना आधीच फेरीवाल्यांना फोन जातात. नगरसेवकाने तक्रार केली तर त्याची माहिती आधीच संबंधिताना मिळत असल्याने उद्या आपल्यावरदेखील अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात, अशी शंका विकास रेपाळे यांनी उपस्थित केली. याला जबाबदार हे प्रशासनातील अधिकारी असल्याने अशा सिस्टिमवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केले. फेरीवाल्यांना पाठीशी घालणारा कोण, केवळ एक क्लार्क, तेथील अधिकारी की त्यांचा प्रमुख अधिकारी. त्यामुळे आधी अशा प्रमुख अधिकाऱ्यावर कारवाईची गरज असल्याचेही ते म्हणाले. तर कंत्राटी स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच ही हप्ता वसुली सुरू असून त्यांच्यावर कारवाईची गरज असल्याचे मतही यावेळी सदस्यांनी व्यक्त केले. फेरीवाला धोरणाबरोबर शहरातील ॲनिमिटी प्लॉट असतील त्या ठिकाणी मार्केट उभारण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. यामध्ये फेरीवाल्यांची युनियन जे चालवत आहेत, त्यांच्याकडून जमा होणाऱ्या हप्त्यावर युनियनचे प्रमुख गब्बर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.