ठाणे : जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या खाडीत रात्री बेसुमार रेती उत्खनन सुरू आहे. शनिवारी देखील सक्शनपंपव्दारे मनमानी रेती काढली जात होती. दरम्यान ओहटी सुरू झाली आणि खाडीतील पाणी कमी झाले. यामुळे मुंब्रा, दिवा आणि कोपरखाडीत डोझर, सक्शनपंप आणि रेतीचे जहाजं आडकले. रविवारी खाडीत दिवसभर अडकलेल्या या जहाजांवर मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहे.लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात आहे. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात आडकले आहे. या कालावधीत रेती माफियांनी खाडीतील रेतीचे मनमानी उत्खनन सुरू केले आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या खाडीत रात्रीच्या सुमारास बेसुमारे रेतीचे उत्खन केले जात आहे. याप्रमाणेच शनिवारी रेती उत्खनन करण्यासाठी खाडीत असताना मध्यरात्रीनंतर ओहटी सुरू झाल्यामुळे पाणी कमी झाले. यामुळे रेती काढण्यासाठी लवाजम्यानिशी खाडीत उतरलेल्या या जहाजांना खाडी किनारा गाठता आला नाही. रविवारी देखील ते खाडीत आडकलेले पाहायला मिळाले.कोपर खाडी व मुंब्यातील खाडीत रेतीमाफियांचीही जहाजं, डोझर आणि सक्शनपंप आडकल्याचे दिवसभर पाहायला मिळाले. सध्याच्या आचारसंहितेचा व अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा रेती माफियांकडून घेतला जात आहे. यास प्रतिबंध घालण्यासाठी तहसिलदार व जिल्हा अधिकारी कार्यालयात असलेल्या रेतीगट शाखा नेहमीप्रमाणे डोळझाक करीत आहेत. अन्य जिल्ह्यातील नदीत रेती उत्खनन करणाऱ्या जहाजांवर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. नदीत जहाज दिसतास जिलेटनच्या सहाय्याने त्यांचा स्फोट करून जहाजं निकामी करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे.
येथील सुस्तावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या आधीही कधी अशी बेधडक कारवाई झाली नाही.रेती उत्खनन करताना टाकलेल्या धाडीत जहाजांवरील कर्मचारी नेहमी प्रमाणे पळून गेल्याचा गुन्हा जवळच्या पोलिसात दाखल होतो. मात्र कर्मचारी किंवा त्यांचा मोरक्याच्या मुसक्या आजूनही बांधता आलेल्या नाही. दुर्लक्षितपणा, डोळेझाक व निष्काळजीतून रेती माफिये मोठ्याप्रमाणात फोफावले आहेत.
बेसुमार रेती उत्खननामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आदी ठिकाणच्या खाडीतील कांदळवनांचे जंगलच्या जंगल नष्ठ झाल्याचे वास्तव आजही दिसून येत आहे. एवढीच काय तर मुंब्राजवळील फास्ट ट्रॅकला जागून असलेले कांदळवन नष्ठ करण्यासह खाडीचा प्रवाह देखील वळवून रेती उत्खनन झाल्याचे आजही दिसत आहे. यामुळे येथून धावणारे मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि फास्ट लोकलच्या रेल्व रूळास धोका निर्माण झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरातील खाडीत रेती उत्खनन कायमचे बंद करून ठिकठिकाणी कांदळवन वाढवण्यावर भर देण्याची अत्यंत गरज आहे.