ठाणे- शनिवारी संध्याकाळी बारवी धरणात ७१.४९ मी. एवढा पाणी साठा होता. धरणातील पाणीसाठयाची उच्चतम उंची ७२.६० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत सुरु असलेले पर्जन्यमान विचारात घेता बारवी धरणात उच्चतम मर्यादेपर्यंत पाण्याची आवक वाढल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारवी व उल्हासनदी काठावरील गांवा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा शनिवारी रात्रीच जारी केला आहे.
अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व मुरबाड तालुक्यातील बारवी/ उल्हास नदीच्या काठावरील विषेशतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोन्याचा पाडा, चोण, राहटोली तसेच कल्याण तालुक्यातील कांबा, वरप, पावशेपाडा, रायते, म्हारळ, टिटवाळा, नडगांव, कुंदे, आने मिसोळ, वसत शेलवली, मोहने, गाळेगाव, दहागाव, पोई आपटी, मांजर्ली, मानिवल इत्यादी नदीकाठावरील गांवे व शहरातील नागरीकांना याद्वारे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगावू सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी जीवितहानी व वित्त हानी टाळणेसाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत. या सर्व ग्रामस्थ आणि आश्रमशाळेतील 300 च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची पंचायत झाली आहे, असे व्यवस्थापक साठे सर यांनी नमुद केले. त्यामुळे शासन यंत्रणेने सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत पुरविणे कामी सहकार्य करावे असे आवाहन या परिसरातील ग्रामस्थ श्री महेश जाधव व प्रवीण जाधव यांनी केली आहे.