कल्याण : रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधील रसायन अंगावर सांडल्याने दुचाकीवरून जाणारे गौरेश साळसकर (३३) आणि त्यांच्या पत्नी गौरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरेश साळसकर यांच्या डोळ्यावर रसायनाचे थेंब उडाल्याने त्यांना एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागली आहे. घटनेनंतर पळून गेलेल्या टँकरचालकाविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे साळसकर दाम्पत्य रविवारी दुचाकीने बाहेर गेले होते. सोबत दीड वर्षाचा मुलगा तनिशदेखील होता. खरेदी आटोपून रात्री १० वाजताच्या सुमारास घरी जात असताना, ते वालधुनीमार्गे पूर्वेकडे जाणाºया उड्डाणपुलाच्या चौकात आले. त्या वेळी बाजूने जाणाºया टँकरमधील रसायन दाम्पत्याच्या अंगावर सांडले. त्यामुळे गौरी यांचा हात, चेहरा आणि पाय भाजला. गौरेश यांच्या डोळ्यात रसायन उडाल्याने त्यांची एका डोळ्याची दृष्टी गेली. सुदैवाने, तनिशला फारसी इजा झाली नाही. घटनास्थळी असलेल्या पादचाºयांनी साळसकर दाम्पत्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. गौरेश यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले असून, गौरी यांच्यावर कल्याणमध्येच उपचार सुरू आहेत.
टँकरमधील रसायन सांडल्याने दाम्पत्य जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:27 AM