डोंबिवली - मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने आहे. धुक्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. दिवा, कल्याण व बदलापूरदरम्यान दाट धुके आहेत. यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, बुधवारीदेखील मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एरव्ही सामान्य मुंबईकरांना नित्याच्या झालेल्या लेटमार्क प्रवासाचा अनुभव बुधवारी देशभरातील अनुयायींनीदेखील घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या (अप) जलद मार्गावर दिवा स्थानक आणि पारसिक बोगदा या दरम्यान मालगाडीची बोगी घसरली. बुधवारी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ही घटना घडली. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी बोगी पुन्हा रुळावर आणण्यात आली. रात्री ७ वाजून ३३ मिनिटांनी अप जलद दिशेकडे पहिली लोकल रवाना झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तथापि, महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेल्या अनुयायांसह दैनंदिन प्रवाशांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर येथे एकत्र आले. संभाव्य गर्दी लक्षात घेता, सोमवार रात्रीपासून अनुयायींनी मुंबईकडे धाव घेतली होती. यामुळे दादर आणि अन्य स्थानकांत गर्दी होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास सुठाणे-नवी मुंबई ट्रान्स-हार्बर मार्गाजवळ मालगाडी घसरली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या जलद मार्गावरील मालगाडी इंजिनपासून ११वी बोगी रेल्वे रुळावरून घसरली. दुर्घटनेमुळे अप जलद मार्गावरील लोकल फेºया अप धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. दिवा ते ठाणे या मार्गावर हे बदल करण्यात आले. या घटनेमुळे लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. घसरलेली बोगी परत रुळावर आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त मालगाडीच्या तीन बोगी मध्य मार्गावर होत्या. यामुळे जलद मार्गावरील लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. यात मेल-एक्स्प्रेसचादेखील समावेश होता. त्यामुळे मध्य रेल्वेसह मेल-एक्स्प्रेसचाही खोळंबा झाला.