लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोकणात जाताना राजाराणी एक्प्रेसमध्ये १४ हजारांची रोकड, चार लाखांचे दागिने आणि एक मोबाईल असा साडे चार लाखांचा ऐवज असलेली कदम कुटूंबियांची बॅग वैद्य कुटूंबाला कुडाळमध्ये सापडली. ही बॅग त्यांनी ठाण्यातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन जाधव यांच्या मदतीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी ही बॅग ठाण्यातील कदम कुटूंबियांकडे सुपूर्द केल्यामुळे वैद्य आणि जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.राजाराणी एक्सप्रेसने कमलेश वैद्य आणि त्यांची पत्नी हे कुडाळ येथे मामाच्या कार्यासाठी एक आठवडयापूर्वी गेले होते. त्याच कोकण रेल्वेच्या डब्ब्यात कणकवलीला भगवती देवीच्या गोंधळाला निघालेले संजय कदम परिवार प्रवास करीत होते. चार बॅगा घेऊन प्रवास करणारे कदम कुटूंब हे कणकवलीत उतरले. उतरताना त्यांची सोन्याचे दागिने आणि काही रोकड असलेली बॅग रेल्वेतच राहिली. दरम्यान, ही बॅग वैद्य कुटूंबियांना कुडाळमध्ये उतरताना सापडली. मात्र, तिकीट नसल्याने घाबरलेल्या वैद्य कुटूंबाने रेल्वे पोलिसांकडे बॅग न देता कार्य आटोपल्यानंतर ठाण्यात वर्तकनगर येथे ती बॅग आणली. बॅग उघडून पाहताच त्यात सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज त्यांना आढळला. वैद्य कुटूंबाने वागळे इस्टेट येथील उपशाखाप्रमुख सचिन जाधव यांना ही माहिती दिली. त्यांनी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मदतीने ती वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केली. बॅगमध्ये मिळालेल्या एका कार्डवरील क्रमांकाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी कदम दाम्पत्याला संपर्क साधला. त्यांना ठाण्यात बोलावून सोमवारी हा चार लाख रु पयांचा मुद्देमाल असलेली बॅग मालक संजय कदम आणि त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करीत माणूसकीचे दर्शन घडविले.
ठाण्यातील वैद्य कुटूबियांच्या प्रामाणिकपणामुळे चार लाखांचे सोन्याचे दागिने सुखरुप मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 10:27 PM
कोकणात जाताना राजाराणी एक्प्रेसमध्ये १४ हजारांची रोकड, चार लाखांचे दागिने आणि एक मोबाईल असा साडे चार लाखांचा ऐवज असलेली कदम कुटूंबियांची बॅग वैद्य कुटूंबाला कुडाळमध्ये सापडली. ही बॅग त्यांनी ठाण्यातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन जाधव यांच्या मदतीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात जमा केली. बॅगमध्ये मिळालेल्या एका कार्डवरील क्रमांकाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी कदम दाम्पत्याला संपर्क साधला.
ठळक मुद्दे दागिन्यांची बॅग केली वर्तकनगर पोलीस ठाण्यात जमा