- कुमार बडदेमुंब्रा : चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले. अपूर्णावस्थेतील एखाद्या रस्त्याचे इतक्या वेळा उद्घाटन करण्याची ही घटना जागतिक विक्रम म्हणून नोंदवला जाण्याची गरज असल्याचे मत या रस्त्यावरून सोमवारी प्रवास केलेल्या प्रवाशांनी व्यक्त केले.या रस्त्यावरील अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यासाठी रेतीबंदर परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर लावण्यात आलेले लोखंडी पिलर अद्याप काढण्यात आलेले नाहीत. बायपासवरील दुभाजकांची कामे अपूर्ण आहेत. दुभाजकांच्या जागेवर काही ठिकाणी फक्त लोखंडी सळया लावण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण ओले असतानाही त्यावरून वाहने गेल्यामुळे खड्डे पडले आहेत. मुंब्रादेवी डोंगराच्या पायथ्याजवळ रस्ता रुंदीकरणासाठी फक्त माती टाकण्यात आली आहे. पुढील काम करून रस्ता तयार करण्यात आलेला नाही. ठाण्याच्या दिशेकडील रस्त्यावर पावसाळ्यात आलेली डोंगरावरील माती ठिकठिकाणी तशीच पसरलेली आहे. यामुळे मुख्य रस्ता अरु ंद झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उंचसखल झाला आहे. त्यावरून वाहने चालवताना हादरे बसत असल्याची चालकांची तक्रार आहे. कामासाठी आणण्यात आलेली अवाढव्य यंत्रे अजूनही बायपासवर असून काम अपूर्ण असल्याची साक्ष देत आहेत. कामासाठी आणण्यात आलेला सिमेंटसदृश भुसा एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून आहे. जवळून वेगाने वाहने जाताच तो हवेत उडत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत आहे. त्यामुळे वाहनचालकाला पुढची वाहने व्यवस्थित दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत बंदमुळे उद्घाटनानंतरच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरून तुरळक वाहने सुरू होती. त्यामुळे अपूर्णावस्थेतील रस्त्याचे उद्घाटन करण्याचे धोके अजून अनुभवास आलेले नाहीत. घाईघाईने रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याबद्दल अनेक वाहनचालकांनी ‘लोकमत’कडे आश्चर्य व्यक्त केले. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही केली.>पत्रीपुलावर कोंडी कायमडोंबिवली : मुंब्रा बायपास खुला झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिलासा मिळाला. हा रस्ता बंद असल्याने पत्रीपुलादरम्यान अवघ्या २० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागत होते. दरम्यान, जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळवली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.मुंब्रा बायपास सुरू झाल्याने पनवेलमार्गे येणारी वाहतूक कल्याणमार्गे येणे बंद झाले. आग्रा रोड, भिवंडीला जाणारी वाहने येतच असतात. ती मार्गी लावताना सुमारे १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत आहे. त्यातही सुधारणा होईल, असे मत पत्रीपूल वाहतूक नियंत्रण शाखेचे सहपोलीस निरीक्षक जी.व्ही. तांबडे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपूर्णावस्थेतील मुंब्रा बायपास धोकादायक, रस्त्यावर माती पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 2:39 AM