ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यांसह राज्यभरातील अन्यही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. इच्छेविरूध्द या संगणकीय प्रणालीच्या बदल्यामुळे बहुतांशी शिक्षक विविध कारणांस्तव त्रस्त आहेत. यास विचारात घेऊन बुधवारी १० आॅक्टोंबर रोजी ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी शासन निर्णय जारी करीत या शिक्षकांना त्यांच्याच जिल्ह्या राहण्याची संधी विविध अटीव्दारे दिली. या निर्णयामुळे आधीच दिवाळी भेट प्राप्त झाल्याचा आनंद शिक्षकांमध्ये आहे.गेल्या वर्षी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील सुमारे साडे आठशे शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांच्या बदल्या पालघरमध्ये झाल्या. तर पालघरच्याही बहुतांशी शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. पण या बदल्या बहुतांशी शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. पण कौटुंबिक अडचणी वाढल्या. त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नाही. अन्यही विविध कारणांमुळे संबंधीत शिक्षकांनी या बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या इच्छेविरोध्दच्या आंतरजिल्हा बदल्यां रद्द करण्यासाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्या रद्द करण्याचे लेखी आदेशही जारी केले आहे. यामुळे राज्यभरातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे कळीचा मुद्दा ठरलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या आता रद्दच होणार असल्याची शिक्षक वर्गात जोरदार चर्चा आहे.ज्या शिक्षकाना आंतरजिल्हा बदल्या नको आहेत, अशा शिक्षकांना त्यांच्या मुळे जिल्हा परिषदेमध्ये विविध अटी व शर्तींवर कायम ठेवण्याचे आदेश आहेत. दिवाळीच्या या दीर्घ सुट्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्हा परिषदेमध्ये पाठविण्याबाबतची कार्यवाही संबंधीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी करावी असे आदेश कांबळे यांनी जारी केले आहेत. यामुळे या बदल्यामुळे त्रस्त असलेल्या शिक्षकांची दिवाळी पुन्हा गोड झाली आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या हिताचा हा शासन निर्णय घटस्थापनेच्या दिवशीच जारी झाल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. या बदल्यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकाना आता पुन्हा त्यांच्या आवडीच्या जिल्ह्यात व त्यांच्या शाळेवर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.** शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठीच्या अटी व शर्ती -* संबंधीत शिक्षकास अद्याप कार्यमुक्त केलेले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त करू नये. त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश सीईओ यांनी काढावेत.* कार्यमुक्त केलेले असल्यास वा त्यांना आंतरजिल्हा बदली नको असल्यास, त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जावयाचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद निक्त असणे गरजेचे आहे.* संबंधीत शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्ष त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही.* शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधीत होणार नाही.