- प्रशांत माने डोंबिवली : वाहनतळाअभावी ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकींचे पार्किंग केले जात आहे. परंतु, तिथे आता केडीएमसीने नो-पार्किंगचे फलक लावल्याने दुचाकीचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या फलकांची कोणतीही माहिती वाहतूक शाखेला नाही. त्यामुळे केडीएमसी आणि वाहतूक शाखेच्या समन्वयाच्या अभावामुळे सध्या वाहनचालकांची फरफट होताना दिसत आहे.रेल्वे समांतर रस्ता हा कल्याण-डोंबिवलीला येजा करणाऱ्यांसाठी जवळचा मार्ग आहे. या परिसरालगत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. परंतु, येथील लोकवस्तीच्या तुलनेत तेथे प्रशासनाने फारशा सुविधा दिलेल्या नाहीत. वाहनतळ नसल्याने कामावर जाणाºयांना आपली दुचाकी वाहने नाइलाजास्तव म्हसोबा चौकात उभी करून रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे. दुसरीकडे आता तेथे रिक्षातळही सुरू झाले आहे. त्यामुळे तेथे होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार बॅरिकेड्स टाकून रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रांगेची सोय केली आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात असल्याने बॅरिकेड्स टाकून अन्य वाहनचालकांनाही शिस्त लावण्यात आली आहे.दरम्यान, चौकातील वाढते पार्किंग पाहता सम-विषम (पी१, पी२) तसेच पे अॅण्ड पार्किंगचा प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी वाहतूक शाखेतर्फे केली जाणार होती. परंतु, सध्या म्हसोबा चौकातील दोन्ही बाजूकडील रस्त्यांवर नो-पार्किंगचे फलक लावल्याने दुचाकीचालकांमध्ये संभ्रमावस्था आहे.>आम्हाला माहिती नाही : आमचा प्रस्ताव पी१-पी२ आणि पे अॅण्ड पार्किंगचा आहे. याबाबत अधिसूचना जारी केलेली नाही. केडीएमसीने नो-पार्किंगचे फलक लावले असले, तरी वाहतूक नियमांची अंमलबजावणी आम्हाला करायची आहे. फलक लावल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिलेली नाही, असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एन. सी. जाधव म्हणाले.>अधिकृत घोषणा नाही : ठाकुर्लीत रस्त्यावर दुचाकींचे पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिथे कोंडी होते. त्यामुळे आम्हीच नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. परंतु, त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. फलकांप्रमाणे कारवाईचे काम वाहतूक शाखेचे आहे, असे मत केडीएमसीचे डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी व्यक्त केले.>...तर पार्किंग करायचे कुठे? : वाहनतळाअभावी म्हसोबा चौकात दुचाकी उभी करावी लागत आहे. परंतु, तेथे आता नो-पार्किंगचे फलक लागल्याने संभ्रमावस्था आहे. जर अंमलबजावणी सुरू झाली, तर आम्ही पार्किंग करायचे कुठे? त्यामुळे आधी वाहनतळ सुरू करावे, मग कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दुचाकीचालक अभिषेक काटकर यांनी दिली.>पार्किंग धोरणाचा मुहूर्त कधी?कल्याण-डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर बेशिस्तीने वाहने उभी करणाºया वाहनचालकांना चाप लावण्यासाठी केडीएमसीने नवे पार्किंग धोरण आखले होते. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, वाहतूककोंडी होणाºया रस्त्यांवर नो-पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदीविक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप व ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षास्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. मात्र, जुन्या नगरपालिका हद्दीतील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठरावीक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. पार्किंग धोरणाला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजवर अंमलबजावणी होऊ शकली नाही. पुन्हा निविदा काढणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळणार कधी, असा सवाल केला जात आहे.
समन्वयाअभावी चालकांची होतेय फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:43 AM