ठाणे : लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. वृषाली पांडुरंग गुंजकर (३२) असे महिलेचे नाव आहे. पाडव्याच्या दिवशी तिचा मामेभाऊ भाऊबिजेला आला असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.मयत वृषाली या पती पांडुरंग आणि दोन मुलांसह ठाण्यातील काजूवाडी येथे राहात होत्या. त्या स्वभावाने तापट होत्या. छोट्या-छोट्या कारणावरून त्या वाद घालायच्या. शुक्रवारी दिवाळी पाडवा होता. याच दिवशी त्यांचा लहान मुलगा चप्पल हरवून घरी आला. त्यातच घरी आल्यावर त्याने फटाक्यांची मागणी केली. त्यामुळे वृषाली यांचा पारा चढला आणि त्या मुलावर चिडल्या. दरम्यान, बीआरसीमध्ये असलेले पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर पडत असताना, तुम्ही मुलांचे जास्त लाड करता, असे म्हणून त्या आणखी भडकल्या. तरीही पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर, वृषाली यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवून दिले व घरात कोणी नसताना, पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.पांडुरंग गुंजकर मुलासह परतले, तेव्हा दार आतून बंद होते. त्यांनी भाऊबिजेसाठी आलेल्या वृषाली यांच्या मामेभावाच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा वृषाली यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मुलाने चप्पल हरवल्याने आईची आत्महत्या, रागाच्या भरात दिला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:13 AM