ठाणे : दारूसाठी पैसे न दिल्याने ८४ वर्षीय नारायण सावंत या वृद्ध पित्यावर कोयत्याने हल्ला करणा-या प्रकाश सावंत (३९, रा. किसननगर, ठाणे) या मुलाला श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयताही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट, किसननगर येथील ‘कदम निवास’ येथे हे दोघेही पितापुत्र वास्तव्याला आहेत. २६ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वडील नारायण हे घरी असताना त्यांचा मुलगा प्रकाश दारूच्या नशेतच तिथे आला. त्याने दारूसाठी त्यांच्याकडे ३० रुपयांची मागणी केली. ते देण्यास वडिलांनी नकार दिला. याचाच राग आल्याने प्रकाशने त्याची आई आणि बहिणीला शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर, घरातील नारळ फोडण्याच्या लोखंडी कोयत्याने वडिलांच्या दोन्ही हातांवर, डाव्या मानेवर, पोटावर तसेच पाठीच्या मणक्यावर वार केले. याच झटापटीत नारायण यांच्या उजव्या हाताच्या करंगळीलाही फ्रॅक्चर केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध नारायण यांनी २८ मे रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तक्रार दिली. पोलिसांनी त्याला सोमवारी दुपारी २ वा.च्या सुमारास अटक केल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.
ठाण्यात दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध पित्यावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 8:33 PM
दारूसाठी वृद्ध पित्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या प्रकाश सावंत या मुलाला श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयताही जप्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्देआई आणि बहिणीलाही मारहाणदारुडया मुलाला अखेर अटकठाण्याच्या श्रीनगरमधील घटना