लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाला घाबरु नका पण जागरुक रहा, असे वारंवार प्रशासनाकडून आवाहन केले जात असले तरी काही ठिकाणी याचा अतिरेकही होत आहे. कळव्यातून वर्तकनगर येथे डायलिसिससाठी जाणाऱ्या राजेश गावडे (४०) यांचा रुग्णालयात जाण्याचा रस्ताच नाहक अडविण्यात आला होता. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दखल घेतल्याने गावडे यांचा मार्गही मोकळा झाला. शिवाय, संबंधितांना योग्य ती समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतील एक पोलीस जमादार कोरोनाग्रस्त कळव्यातील ‘गुरु कृपा’ बिल्डींगमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना २० एप्रिल रोजी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. तर त्यांच्या पत्नी आणि मुलीला भार्इंदरपाडा येथे विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. या इमारतीचा संपूर्ण परिसर ठाणे महापालिकेने निर्जतूकीकरण केला आहे. या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार मात्र सील केले आहे. या इमारतीमध्ये अत्यावश्यक सेवेचा पुरवठा स्थानिक नगरसेवक मुकूंद केणी आणि ठामपा कळवा प्रभाग समितीमार्फतीने केला जातो. याच इमारतीमधील निवृत्त पोलीस अधिका-याचे चिरंजीव राजेश हे किडनीच्या आजाराने ग्रस्त असून त्यांना वर्तकनगर येथे डायलेसिससाठी नियमित जावे लागते.मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अन्य एका छोटया मार्गाने सोमवारी ते डायलिसिससाठी गेले. मात्र ते परतल्यानंतर त्यांचा इमारतीमध्ये जाण्याचा हाही लाकडी बांबूने मार्ग बंद करण्यात आला होता. तेव्हा त्यांना इमारतीला लांबचा वळसा मारुन कंपाउंड वॉल चढून द्राविडी प्राणायम करीत कसातरी आत प्रवेश मिळविला. आता पुढच्या वेळी डायलेसिसला कसे जायचे, या चिंतेने त्यांनी कळव्याच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार केली. याच तक्रारीची सोशल मिडियातूनही बरीच चर्चा झाली. याची पोलीस आयुक्तांनी तात्काळ दखल घेत कळवा पोलिसांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठविले. तेंव्हा गुरूकृपा इमारतीच्या बाजूला असलेल्या जय मातादी इमारतीमधील काही रहिवाशांनीच कोरोनाबाधित व्यक्ती त्या छोटया मार्गाचा वापर करतील, असा समज करुन तो मार्गच बंद केल्याचा दावा केला. राजेश यांचा भाऊ नितीन गावडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मंदार केणी यांच्यासमवेत पोलिसांनी बैठक घेऊन असा प्रकार यापुढे होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित गावडे यांचाही जाण्या येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस आयुक्तांच्या आदेशामुळे डायलिसिस रुग्णाच्या वाटेतील ‘अडथळे’ झाले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:58 PM
एकीकडे कोरोनाला घाबरु नका पण जागरुक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी अतिरेकही केला जात असल्याचे चित्र कळव्यातील एका सोसायटीत पहायला मिळाले. ज्या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला त्याच इमारतीमधील किडनीच्या रुग्णाला मात्र डायलिसिससाठीही बाहेर पडतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ठळक मुद्दे कोरोनाच्या भीतीने रहिवाशांनी अडविली होती वाट सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या प्रकाराची घेतली गंभीर दखल