भाईंदर - मीरा- भाईंदर शहरात मकर संक्रांत सणावेळी साजरा होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे अनेक पक्षी जीव गमावतात, जखमी होतात. त्यामुळे पतंग न उडविता सण उत्साहाने साजरा करा, असे आवाहन करून लोकांमध्ये वर्षानुवर्षे जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांमुळे शहरातील पतंग उडविण्यासह जखमी पक्षांचे प्रमाण यंदा निम्यावर आल्याचा दावा जैन अॅलर्ट ग्रुपने केला.यामुळे यंदा एका सुतार पक्षासह ५४ कबुतर जखमी झाले तर ७ कबुतरांचा मृत्यू झाल्याचे जैन अॅलर्ट ग्रुपचे कल्पेश नागडा यांनी सांगितले. मीरा- भाईंदर शहरामध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पतंग महोत्सवाला येथे उधाण येते. परंतु या पतंगांच्या महोत्सवामुळे आकाशात भ्रमंती करणाऱ्या पक्ष्यांवरच संक्रांत येते. पतंगांच्या मांज्यात पक्षी अडकल्याने अनेकदा ते गतप्राण होतात तर काही जखमी होतात. यात प्रामुख्याने कबुतरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा जखमी पक्ष्यांवर स्थानिक सामाजिक संस्थांद्वारे उपचार केले जातात. या सणावेळी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी विविध समाजिक संस्था उपचार शिबिरे स्थापन करून त्यात पशु-पक्ष्यांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची व्यवस्था करतात. सुरुवातीला जैन अॅलर्ट ग्रुप व अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन सामाजिक संस्थांनी शहरातील विविध भागांत संक्रातीच्या काळात पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी होणा-या पक्ष्यांना वाचविण्यासाठी २००८ मध्ये मोहीम सुरू केली. त्यांनी शहरात ठिकठिकाणी जखमी पक्ष्यांच्या उपचाराचे शिबिर सुरू केले. सुरुवातीच्या काळात सुमारे ४५० हून अधिक पक्षी जखमी तर १०० हून अधिक मृत्युमुखी पडले होते. हा आकडा कमी करण्यासाठी या दोन्ही संस्थांनी थेट पतंग उडविण्याचे तोटे लोकांना सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचा परिणाम सकारात्मक होऊ लागल्याने त्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात पतंग उडविणा-यांचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रमाणही कमी झाले. २०१५ मध्ये २२७ पक्षी जखमी तर २५ मृत्यू, २०१६ मध्ये १८० जखमी व २० मृत्यू, २०१७ मध्ये १२३ जखमी तर १८ मृत्यू, २०१८ मध्ये १०७ जखमी व १७ मृत्यू, यंदा त्याचे प्रमाण निम्म्याहून कमी झाल्याचे जैन अॅलर्ट ग्रुपचे पीयूष धामी यांनी सांगितले. पतंग महोत्सवावेळी झाडांसह इतर ठिकाणी अडकलेला मांजा जमा करून देणाऱ्यांना सुमारे एक किलो मागे ५० रुपये देण्याचा फंडा जैन अॅलर्ट ग्रुपने सुरू केला. तसा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याने अनेकांनी मांजा आणून संस्थेच्या हवाली करून रक्कम मिळवल्याचे सांगण्यात आले.
जनजागृतीमुळे पतंग उडविण्यासह जखमी पक्ष्यांचे प्रमाण निम्म्यावर; जैन अलर्ट ग्रुपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:57 PM