कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे धंदाच झाला नाही तर पोराबाळांची दिवाळी कशी करायची, असा संतप्त सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्डे का बुजविले जात नाही. त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे याचा जाब विचारण्यासाठी रिक्षा चालकांनी महापालिका मुख्यालयात धडक दिली. खड्डे बुजविले गेले नाहीत तर दिपावली पूजनाच्या दिवशीच रिक्षा बंद आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे मंगळवारी सकाळीच कल्याण पश्चिमेत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचबरोबर दररोजच वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावर खड्डे पडले आहे. तसेच पुलाचे गर्डर उघडे पडले आहे. त्यामुळे पूलावर नेहमीच वाहतूक कोंडी होती. त्याचा फटका रिक्षा चालकांना होत आहे. प्रवाशांना रिक्षा स्टॅण्डमध्ये रिक्षा उपलब्ध होत नाही. तर एका फेरीसाठी दोन ते तीन तास लागतात. या सगळ्या कोंडीत रिक्षा चालक सापडला आहे. त्याच्या कुटुंबाची दिवाळी कशी होणार. धंदाच होणार नाही तर दिवाळी कशी होणार? असा सवाल रिक्षा चालक प्रशांत धनावडे यांनी उपस्थित केला आहे. रिक्षा चालकांनी आज मुख्यालयात धडक दिली. ठाणे रिजन रिक्षा चालक मालक महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्याच्यासह रिक्षा चालकांनी महापालिकेचे शहर अभियंता प्रामोद कुलकर्णी यांची भेट घेतली. रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत. तर दिपावली पूजनाच्या दिवशीच रिक्षा बंद करण्याचा इशारा दिला.
रस्त्यावरील खड्डय़ामुळे रिक्षा चालकाचा मृत्यू
रस्त्यावरील खड्डय़ामुळे काळा तलाव मकबरा येथे राहणारा रफीक शेख या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. रफीक शेखला ह्रदयविकाराचा त्रस होता. त्याला डॉक्टरांनी रिक्षा चालवू नको असे सांगितले होते. मात्र कुटुंबाचे पोट कसे भरणार या विवंचनेत त्याने रिक्षा चालविण्याचे योग्य समजले. दोन दिवसापूर्वी तो रिक्षा चालवित असताना रस्त्यावरील खड्डयामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्याचा रस्त्यात रिक्षा चालवित असताना मृत्यू झाला. या घटनेकडे रिक्षा चालक मालक संघटनेने लक्ष वेधले आहे.