- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मुंबई - नाशिक महामार्गालगतच्याच इतिहासकालीन किल्ले माहुलीच्या कुशीत असलेल्या पाच महसुली गावे आणि १८ आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. विशेष म्हणजे महसुली गावांना ज्या विहिरींवरून पाणी योजना सुरू होती त्या विहिरींचे पाणी देखील आटल्याने ग्रुपग्रामपंचायत आवाळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे.ग्रुपग्रामपंचायत आवाळे मध्ये माहुली, चांदरोटी, आवाळे, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांचा समावेश आहे. तसेच जुनवणी, शाळेचा पाडा, ग्रामपंचायत पाडा, आंबेडोह पाडा, वाडूपाडा, टोकरेपाडा, जांभूळपाडा, बेरिसंगी पाडा, सुतार पाडा, खरपडे पाडा, पत्र्याचा पाडा, बोरीचा पाडा आणि इतर असे १८ आदिवासी पाडे आहेत. या ग्रामपंचायतीमधील गाव - पाड्यांची लोकसंख्या तब्बल चार हजार आहे. विशेष म्हणजे या ग्रामस्थांना अजूनही थेट नदीवरील नळपाणी योजनेचा लाभ मिळालेला नाही. गावात असलेल्या विहिरींवरून नळाद्वारे पाणी, तर काही आदिवासी वाड्यांना बोअरवेलद्वारे पाणी सुरू असते. यंदा मात्र एप्रिलअखेरपासूनच पाणी टंचाईचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो आहे.किल्ले माहुलीवर बारमाही पाणीमाहुली किल्ल्यावरील भांडार गडावर आजही पाण्याचे तलाव, दगडी मोठ्या पाण्याच्या टाक्या अस्तित्वात आहेत. गडावर पर्यटनासाठी सोयी जरी कमी असल्या तरी पर्यटकांना गडावर गेल्यावर या तलावातील, दगडी पाण्याच्या टाक्यांमधील थंड पाणी बारमाही उपलब्ध असते. पाऊसकाळात याच गडावरून वाहणाऱ्या भारंगी नदीचे पाणी भातसा नदीला जावून मिळते. तेच पाणी अडवण्यासाठी माहुली किल्ल्याच्या खालील बाजूस शासनाने वेगवेगळे बंधारे बांधले आणि परिसरातील माहुली आणि चांदरोटी गावाजवळील जुन्या तलावांचा गाळ काढून ते स्वच्छ केले तर आसपासच्या आदिवासी पाड्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती माहुली निसर्ग सेवा न्यासच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आमच्या ग्रामपंचायतीमार्फत काही खाजगी कंपनी मालकांची मदत घेऊन परिसरात जे शिवकालीन तलाव आहेत, त्यांचे गाळ काढण्याचे काम आम्ही लवकरच हाती घेणार असून सद्यस्थितीत पंचायत समिती प्रशासनाकडे वाढीव टँकरची मागणी केली आहे. - प्रदीप आगीवले, उपसरपंच, ग्रुपग्रामपंचायत आवाळेकिल्ले माहुलीची उंची जास्त असल्याने गडावरील पाणी खाली आणण्यापेक्षा परिसरातील शिवकालीन तलाव तसेच भारंगी नदीवर शहापूरपर्यंत सिमेंट बंधारे बांधले गेले तर माहुली परिसरासोबतच शहापूरचा पाणी प्रश्नही निकालात निघू शकतो. यासाठी आमची संस्था नेहमीच प्रशासनास सहकार्य करेल. - अॅड. अमेय आठवले, माहुली निसर्ग सेवा न्यास संस्था, शहापूरमाहुली जवळील भाग उंचावर आहे आणि पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नाही. सध्या तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे. पुढे ठोस उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवण्यात येतील.- विजया पांढरे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती, शहापूर
किल्ले माहुलीच्या कुशीतील गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:19 AM