ठाणे : दर्श अर्थात गटारी (आषाढी) अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वनविभागाने ठाण्यातील येऊरच्या पायथ्यालाच बुधवारी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे या भागात पार्टी साजरी करण्यासाठी जाणा-या तळीरामांची चांगलीच गोची झाली. दारूची वाहतूक करणा-या एकासह दारू पिऊन धिंगाणा घालणा-या १६ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खास गटारीच्या निमित्ताने येऊरच्या जंगलामध्ये तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणा-या तळीरामांवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आणि बुधवारी वॉच ठेवला होता. वनात जाणा-या मार्गावर वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी याठिकाणी बुधवारी सकाळपासूनच तैनात होते. संपूर्ण दिवसभरात या मार्गावरून मद्याची वाहतूक करणाºया एकाला ताब्यात घेण्यात आले. मद्यप्राशन करून धिंगाणा घालणा-या १६ जणांवर कारवाई करण्यात आली. तर, मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया ११ तळीरामांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.याशिवाय, येऊरच्या परिसरात पार्टीसाठी बंदी करण्यात आली होती. त्यामुळे येथील सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या ४२ कर्मचा-यांनी पहारा ठेवला होता. त्यामुळे शहरातील इतर हॉटेल आणि ढाब्यांवर गटारीनिमित्त पार्ट्यांसाठी मोठी गर्दी असली, तरी येऊरमधील संजय गांधी राष्टÑीय उद्यानात मात्र हे चित्र अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे पावसात निसर्गरम्य अशा येऊरमध्ये पार्टी करणा-यांचा बेत आखणा-या तळीरामांच्या योजनेवर मात्र पाणी फेरले गेल्याने अनेकांची गोची झाली. दरम्यान, वनविभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिसांनी केला.
ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे येऊरमध्ये जाणाऱ्या तळीरामांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 10:49 PM
ठाण्यातील येऊर परिसरात पार्टीसाठी दारूची वाहतूक करणा-या एकासह दारू पिऊन धिंगाणा घालणा-या १६ जणांविरुद्ध तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-या ११ तळीरामांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली
ठळक मुद्देपोलीस आणि वनविभागाने ठेवली कडक सुरक्षा धिंगाणा घालणा-या १६ मद्यपींवर कारवाई११ मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल