मीरा रोड : बॉलिवूडच्या नावाने परिचित असलेल्या मीरा रोड येथील चार मजली निवासी इमारतीला मंगळवारी रात्री उभा तडा गेला. १५ वर्षे जुन्या या इमारतीच्या पिलरलाही तडा गेला असून त्यामुळे इमारत एकीकडे झुकली आहे. खबरदारी म्हणून ८० कुटुंबीयांना या इमारतीतून काढून महापालिकेच्या हॉलमध्ये त्यांची निवासव्यवस्था करण्यात आली.
मीरा रोडच्या हाटकेश भागातील ग्रीनवूड कॉम्प्लेक्समध्ये चार विंगची चार मजली इमारत आहे. चारही इमारतींना सिनेकलाकारांची नावे देण्यात आली आहेत. ‘अमिताभ’मध्ये ३०, ‘अमन’मध्ये २०, ‘शाहरूख’मध्ये २०, तर ‘माधुरी’मध्ये १० अशा एकूण ८० सदनिका आहेत. मंगळवारी सायंकाळी अमिताभ व अमन इमारतींच्या मध्यभागी उभा तडा गेला. ‘अमिताभ’च्या तळ मजल्यावर मध्यभागी असलेल्या पिलरलाही तडा जाऊन जिना भिंतीपासून वेगळा झाला. त्यामुळे इमारत डाव्या बाजूला झुकली. या घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलासह काशिमीरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रहिवाशांना तत्काळ इमारत रिकामी करण्यास सांगितले. मंगळवारी रात्री या रहिवाशांची पालिकेच्या महाजन हॉलमध्ये निवासव्यवस्था करण्यात आली. ३३ कुटुंबं सदनिकाधारक असून ४७ कुटुंबं भाडेकरू आहेत. सदनिकाधारक असलेल्या ३३ कुटुंबीयांची पालिकेकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये तात्पुरती सोय केली जाणार आहे. पालिकेने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण केले असून १० दिवसांत त्याचा अहवाल येईल. त्यानुसार, पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या घटनेने रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या इमारतीला लागूनच मोठ्या निवासी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे हादरे बसत असून इमारतीला धोका असल्याची ओरड येथील रहिवासी सहा महिन्यांपासून करत आहेत. येथील लोकप्रतिनिधींकडे रहिवाशांनी दाद मागितली. मात्र, उपयोग झाला नसल्याचा आरोप येथील त्यांनी केला.धोकादायक खोदकामशहराची जमीन दलदलीची असून त्याअनुषंगाने उंच इमारतींसाठी खोदकाम करताना विकासक किंवा पालिका आवश्यक खबरदारी घेत नाही. त्यामुळे जून महिन्यात मीरा रोडच्या विनयनगरमध्ये राज एस्कोटिका इमारतीचा पिलर तसेच तळाला तडे जाऊन, संरक्षण भिंत पडली होती. बाजूलाच सुरू असलेल्या खोदकामामुळे हा प्रकार घडला होता. त्यानंतर, काही दिवसांनीच रामदेव पार्कच्या मीरा सागर परिसरात खोदकामामुळे पालिकेचा रस्ता आणि गटाराचा काही भाग खचला होता. महापौरांच्या प्रभागातच हा प्रकार घडला होता.