प्रज्ञा म्हात्रे, ठाणेटी.व्ही.वरील मालिकांमुळे घरबसल्या करमणूक होत असल्याने आता खिशाला खार लावून नाटक पाहायला प्रेक्षक येत नाही. एकेकाळी नाट्यगृहांतील सर्व नाटके गर्दी खेचत होती. मात्र आता ते चित्र पालटले आहे. चॅनलच्या वाढत्या स्पर्धांमुळे नाटकांच्या बुकींगवर विपरीत परिणाम झाला असल्याची खंत ज्येष्ठ नाटककार व ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.नाट्यसंमेलन प्रथमच ठाण्यात होत असल्याचा आनंद गवाणकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, ठाणे आणि माझा अतिशय जवळचा संबंध आहे. माझी बौद्धीक भूक प्रथम ठाण्यानेच भागवली. ११ वी पास झाल्यावर १९६१ साली माझा वर्गमित्र जनार्दन चेऊलकर याच्याबरोबर दिवा येथे राहण्यास आलो. त्यावेळी मी जे जे स्कूल आॅफ आर्टमध्ये शिकत होतो. दिव्याला मूलभूत सुविधा नव्हत्या. मला वाचनाची आवड असल्याने आणि दिवा येथे वाचनालय नसल्यामुळे ठाण्यातील सार्वजनिक वाचनालयाचा सदस्य झालो. तेथून माझ्या वाचन संस्कृतीला सुरूवात झाली.कशासाठी प्रेमासाठी या माझ्या पहिल्या नाटकाचा शुभारंभ १८ जून १९६६ साली परळ येथील दामोदर हॉल येथे झाला. यावेळी मला दिवा येथील आगरी समाजाने प्रचंड मदत केली व भरभरुन प्रेम दिले. प्रायोगिक रंगभूमीवर पौष्टीक वातावरण मिळते. चांगले लेखक, चांगले तंत्रज्ञ, चांगल्या एकांकिका या रंगभूमीवर तयार सादर होत आहेत. प्रायोगिक नाटकांमधील जी स्पर्धा आहे ती व्यावसायीक रंगभूमी पुढे नेण्यासाठी फायदेशीर आहे, असे ते म्हणाले.
मालिकांमुळे नाटकांचे अर्थकारण बिघडले
By admin | Published: November 26, 2015 1:43 AM