अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवामुळे खासगीकरणाचा काही राजकीय नेते व काही प्रशासकीय अधिकारी यांचा डाव यशस्वी होणार असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू होते. रुग्णालयातील अनागोंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा फायदा उचलून एखाद्या खासगी कंपनीच्या गळ्यात हे रुग्णालय बांधण्याचा डाव आखल्याची चर्चा आहे.
या रुग्णालयात रोजच्या रोज ओपीडीवर दोन हजारांच्या आसपास रुग्ण उपचारांसाठी येतात, परंतु जेव्हापासून हे रुग्णालय सुरू झाले, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे हे रुग्णालय चर्चेत राहिले आहे. मागील काही वर्षांत या रुग्णालयाच्या जागेतील काही भाग हा खासगी संस्थांना देण्यात आला. त्यातही रुग्णांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया व्हाव्यात, या हेतूने या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एखादा रुग्ण येथे दाखल झाला तर त्याचे आधार आणि पॅनकार्ड जोपर्यंत रुग्ण डिस्चार्ज होत नाही, तोपर्यंत ठेवून घेतले जाते, तसेच आलेल्या रुग्णाला २४ तासांवर कसे ठेवता येईल, यासाठी येथे प्रयत्न होतो. सुरुवातीला हृदयरोग त्यानंतर मूत्रपिंड विकारासाठी त्याच संस्थेला येथे जागा दिली गेली आहे.
कळवा रुग्णालयातील तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील जागा खासगी रुग्णालयाला आंदण देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे भाडे किंवा खर्च महापालिकेला दिला जात नाही. महापालिकेने त्यांना मोफत जागा देऊ केली आहे. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांना डिस्चार्जच्या वेळेस कोणत्याही स्वरूपाचे टेस्ट रिपोर्ट दिले जात नाहीत. यावरून अनेकदा गोंधळ झाल्याचेही दिसून आले.
अहवाल काय सांगतो?
२०१८मध्ये खासगी संस्थेला येथील जागा देण्यासंदर्भातील एक प्रस्ताव पुढे आल्यानंतर नॅशनल मेडिकल कौन्सिलची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यानुसार एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यात अशी परवानगी दिली तर मेडिकल कॉलेजची जागा कमी होऊ शकते आणि तसे झाल्यास मेडिकल कॉलेजची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे नमूद होते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी त्यावर शेरा मारला असून, या सर्व बाबींचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा, असेही सांगितले होते. परंतु त्यानंतरही खासगी संस्थेला येथील जागा दिली. आता येथील मेडिकल कॉलेज लोढा येथील इमारतीत हलविण्याचे सूतोवाच महापालिकेने केले आहे. त्यामुळे निश्चितच कळवा रुग्णालयात मोठी जागा उपलब्ध होणार आहे.