मीरारोड : मीरा भाईंदर मध्ये नवरात्री निमित्त ध्वनी प्रदूषण खूपच वाढले असताना दुसरीकडे आयोजकांच्या बेजबाबदार लोकांना पोलिसांकडून पाठीशी घातले जात असल्याने सायंकाळ पासून रात्री पर्यंत वाहतूक कोंडी सुद्धा प्रचंड होत आहे. नवरात्री उत्सवासाठी रात्री १० व काही दिवस रात्री १२ वाजे पर्यंतची ध्वनिक्षेपक, वाद्यवृंदाची परवानगी दिली असली तरी कायदे नियम व न्यायालयाच्या आदेशानुसार घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे शहरात सर्रास उल्लंघन केले जात आहे. परंतु पोलिसांकडून मात्र ध्वनी मर्यादेच्या नियमांचे काटेकोर पालन व कारवाई केली जात नसल्याने ध्वनी प्रदूषण करणारे आयोजक मोकाट आहेत. मात्र या मुळे रुग्णालय क्षेत्रासह निवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढल्याने रुग्ण, वृद्ध, परीक्षा असणारे विद्यार्थी, आदींना ध्वनी प्रदूषणाचा जाच सहन करावा लागत आहे.
त्यातच आयोजकांकडून नवरात्री साठी आवश्यक वाहन पार्किंग आणि कार्यकर्त्यांचे नियोजन केले गेले नसताना देखील पोलीस आणि पालिकेने लागेबांधे सांभाळत कार्यक्रमांच्या परवानग्या दिल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी तर आयोजकांकडून रस्ता पूर्णपणे बंद करून वा रस्ता नाममात्र मोकळा ठेवला आहे. रहदारीच्या सार्वजनिक रस्त्यांवरच नवरात्री दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांची वाहने बेशिस्तपणे कुठे ही उभी केली जात आहेत. जेणेकरून प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा मनःस्ताप वाढला आहे. भाईंदर पश्चिमेला तर अग्निशमन दलाचा मार्गच ह्या वाहतूक कोंडीने कोंडला गेला आहे. भाईंदर उड्डाण पूल व परिसरात तर वाहन कोंडी मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
आवाजाच्या मर्यादेचे उघड उल्लंघन होत आहे. ध्वनी प्रदूषण त्रासदायक ठरले असताना त्यात वाहन कोंडीची भर आणखी जाचक ठरली आहे. नागरिकांचे हित, कायदे - नियम व न्यायालयाच्या आदेशांना आयोजकांच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी पोलीस आणि पालिकेने संपूर्ण शहर वेठीस धरले आहे. बेजबाबदार अधिकारी व आयोजकांवर कठोर कारवाई करावी व उल्लंघन करणाऱ्यांना परवानग्या देऊ नये. असे मराठी एकिकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटले.