भिवंडी : भिवंडी शहरात स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजले असून भर पावसाळ्यात शहरातील अनेक भागात खाजगी ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला साचले आहेत. या कचऱ्याच्या ढिगावर पाणी पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने या दुर्गंधीने देखील नागरिक हैराण झाले आहेत.
शहरातील अंजूर फाटा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात कचरासाचला असून मनपाच्या ठेकेदारांकडून दुपारी उशीरापर्यंत हा कचरा उचलला जात नाही.तर अनेक वेळा या ठिकाणचा कचरा उचलण्यास ठेकेदार हलगर्जीपणा करत असतात. अंजुर फाटा नाक्यावर सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते त्यामुळे नागरिकांचा प्रवाशांना नाक मोठे धरून येथून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.