उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील महिला बाल कल्याण विभागचे महिला निरीक्षण गृहाचा वीज पुरवठा महावितरण विभागाने खंडित केल्याने, निरीक्षण गृहातील मुलीवर गेल्या २२ दिवसापासून अंधारात राहण्याची वेळ आली. महावितरण विभागाला विनंती करूनही वीज पुरवठा खंडित केला. अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली.
उल्हासनगर तहसील कार्यालय शेजारी महिला निरीक्षण गृह असून निरीक्षण गृहाचा वीज पुरवठा २२ दिवसापूर्वी महावितरण विभागाने खंडित केला. लाखोंची वीज बिल थकबाकीचे असल्याचे कारण महावितरण विभागाने दिले असून नोटीस देऊनही महिला व बाल विभागाने काहीही उपाययोजना केलली नाही. अशी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी शासन व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महिला निरीक्षण गृहाच्या वीज पुरवठा खंडित केल्याचे सांगून मुली व अधिकारी, कर्मचारी अंधारात असल्याची माहिती दिली. तसेच विभागाच्या अधिकारी सुवर्णा जाधव यांनीही याबाबत वारिष्टना माहिती देऊनही वीज बिलाचा भरणा अध्याप केला नाही. त्यामुळे विभागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
शहरातील निरीक्षण गृहातील मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याची शक्यता चंदनशिवे यांनी व्यक्त केली. तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय व महिला संरक्षण विभागात गेल्या महिन्या पासून विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने सर्व कामकाज ठप्प झाल्याचे चंदनशिवे यांचे म्हणणे आहे. महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी तसेच इतर अधिकारी वर्ग यांनी बीज बिल भरून विद्युत पुरवठा सुरू करून विभागातील अंधाराचे साम्राज्य दूर करावे. अशी मागणी होत आहे. स्थानिक आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, खासदार श्रीकांत शिंदे, यांच्यासह स्थानिक राजकीय नेत्यांनी याविरोधात आवाज न उठविल्याने, नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत येत असलेले इतर विभागाचा विधुत पुरवठा खंडित केला होता. मात्र बिलाचे काही पैशे भरल्यावर, त्यांचा वीज।पुरवठा सुरळीत केल्याची बाब उघड झाले.