बदलापूर:बदलापूर पालिका कार्यालयात घरपट्टी भरण्याची यंत्रणा संगणीकृत करण्यात आल्यामुळे इथली संपूर्ण यंत्रणा ही सर्व्हरवर अवलंबून आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे त्यामुळे आज या नागरिकांनी थेट पालिका कार्यालयास संताप व्यक्त केला.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्व्हर मध्ये प्रॉब्लेम आल्याने घरपट्टी भरण्याची यंत्रणा ठप्प पडली होती. यावर तोडगा काढण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे नागरिकांना घरपट्टी भरण्यामध्ये अडथळा येत होता. घरपट्टी भरण्यासाठी अनेक नागरिक स्वतःचं काम सोडून पालिका कार्यालयात येत असल्यामुळे त्यांनी सहाजिकच आपला संताप व्यक्त केला. संगणीकृत यंत्रणा ठप्प पडत असेल तर पर्यायी व्यवस्था देखील पालिकेने करणे अपेक्षित होते. मात्र ती पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अखेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकाऱ्याने पालिकेच्या सुरक्षारक्षकांना कार्यालयात बोलावले. घरपट्टी भरण्याची यंत्रणा याआधी देखील अनेक वेळा ठप्प पडली होती. अनेक वेळा सर्वरच्या प्रॉब्लेम मुळे भरणा होत नसल्यामुळे नागरिकांना घरी परतावे लागत होते. एवढेच नव्हे तर ऑनलाईन घरपट्टी भरणारी यंत्रणा देखील अनेक वेळा टप्पा पडत असल्यामुळे ऑनलाइन घरपट्टी भरण्यात देखील अडथळा येत आहे. त्यामुळे सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.