लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असल्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा उत्साहात निघत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा प्रारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे शुभ आशीर्वाद घेतले. त्यांनी जैन बांधवांशी संवादही साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार सर्वांना प्रेरणादायी ठरावेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल, असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.