उल्हासनगर : दिवाळी सणानिमित्त नेहरू चौक परिसरातील गजानन व जपानी कपडे मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. खरेदीच्या निमित्ताने स्थानिक व्यापारी व फेरीवाले आमनेसामने आले असून त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आमदार आयलानी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उल्हासनगर कॅम्प नं-२ मधील नेहरू चौक ते शिरू चौक दरम्यान मार्केट मध्ये नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी एकच गर्दी केली. नागरिकांची गर्दी लक्षात घेवून वाहतूक पोलिसांनी मोठया गाड्यांना जाण्या-येण्यास बंदी केली.
या गर्दीतून नागरिकांनाही जाता येत नाही. गर्दीचा फायदा उठविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फेरीवाल्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. मंगळवारी गोलमैदान नेहरू चौक परिसरात आठवडी बाजार भरत असल्याने, गर्दीचा उंचाक निर्माण झाला. वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. तसेच महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. दरम्यान फेरीवाले व स्थानिक व्यापारी आमनेसामने आल्याने, ऐन दिवाळीत अनर्थ होऊ नये म्हणून व्यापारी संघटनेचे दिपक छतवाणी यांनी पुढाकार घेऊन आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी व्यापारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार कुमार आयलानी यांनी घेतलेल्या बैठकीला व्यापारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक छतवानी, सहायक आयुक्त अजित गोवारी, तुषार सोनावणे, स्थानिक व्यापारी आदीजन उपस्थित होते. आमदार आयलानी यांनी दोन्ही बाजू एकून मध्यस्थ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिका सहायक आयुक्त तुषार सोनावणे व अजित गोवारी यांना यावर तोडगा काढण्याचे सांगितले. दिवाळी सण व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी मोटरसायकली व इतर वाहने आणण्यास टाळावे. असा निर्णय घेण्यात आला. तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करून उत्तम सेवा देण्याचे आयलानी व छतवानी यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.
फटाक्यांची दुकाने रात्र-दिवस सुरू नेहरू चौक परिसरात हजारोच्या संख्येने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. याच ठिकाणी फटाक्याची दुकाने असून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता, फटाक्यांची विक्री होत आहे. यामध्ये महापालिकेने बंदी केलेल्या १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके आहेत. रात्रभर फाटक्याचे दुकाने सुरू असल्याचे चित्र असून महापालिका प्रशासन व पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.