- अजित मांडकेठाणे - महायुतीत मनसेला सामावून घेण्याबाबत चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर, ठाणे अथवा पालघर यापैकी एक लोकसभेची जागा भाजपने मनसेला मिळवून देण्याकरिता वाटाघाटी करावी, असा आग्रह धरला होता. मात्र, अद्याप मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाचे घोंडगे भिजत पडले असल्याने, लोकसभेची जागा लढविणे अनिश्चित असल्याने कार्यकत्यांचे अवसान गळून गेले आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाचा झेंडा घेऊ हाती, असा सवाल मनसैनिकांच्या मनात आहे.
२०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून मनसेचे अभिजीत पानसे यांना ४८ हजार ८६३ मते पडली होती. २०१९ मध्ये मनसेने उमेदवारच दिला नव्हता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला ठाणे शहर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी आदींसह इतर मतदारसंघातून लाखोंची मते मिळाली होती. यंदा मनसेने लोकसभेची तयारी सुरू केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे, मराठी पाट्या किंवा टोल नाक्यावरील वसुलीचा मुद्दा लावून धरला होता.
- राज ठाकरे यांनी ठाण्यात मागील पाच ते सहा महिन्यांत तीन ते चार वेळा ठाण मांडले होते. स्थानिक पातळीवरील मुद्दे उचलून मनसेने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता, लोकसभा निवडणूकलढविण्याचे संकेत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिले होते. तळागाळात जाऊन मनसेकडून निवडणुकीची तयारी केली होती. ठाण्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मनसेकडून निश्चित झाले होते.
- राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर वातावरण बदलल्याचे चित्र ठाण्यासह कल्याण आणि पालघरमध्ये दिसू लागले आहे. आता राज आपली भूमिका येत्या ९ एप्रिलला जाहीर करतील, असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, त्यानंतरच लोकसभेची दिशा निश्चित होईल