मीरारोड - मीरा भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्या भरात ७ वेळा विविध कारणांनी खंडित झाल्याने शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत आहे.
मीरा भाईंदर शहराला स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर व महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका प्रशासन सांगते. मात्र शहराला पाणी मात्र रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच मिळते . सध्याची लोकसंख्यान विचारात घेतली तर रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे . मागणीच्या तुलनेत रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी शहराला कमी मिळते . शिवाय महानगरपालिकेकडे ह्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य स्तोत्र नाही.
शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होतो. पाण्याचे योग्य नियोजन करुन सद्यस्थितीत शहरास ३६ ते ५० तासांनंतर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे स्टेम व एमआयडीसी पैकी एका संस्थेने शट डाऊन घेतल्यास त्या मध्ये किमान २० दिवसांच्या कालावधीचे अंतर ठेवून शट डाऊन घ्यावा असे दोन्ही संस्थाना पालिकेने कळवले आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली.
१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ७ वेळा पाणी पुरवठा खंडित
१५ मार्च रोजी स्टेम ने जलवाहिनी दुरुस्ती व फ्लो मिटर बसविणेकरीता तर १५ एप्रिल रोजी टेमघर पंपिगची मुख्य जलवाहिनी ब्रेक झाल्यामुळे शट डाऊन घेतला . एमआयडीसी कडून १६ मार्च रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने, २४ मार्च रोजी बारवी गुरुत्व जलवाहिनी दुरुस्ती साठी , ३१ मार्च रोजी घोडबंदर रोडवर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ८ एप्रिल रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने व १५ एप्रिल रोजी बदलापुर समाधान हॉटेल समोर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल उडाल्याने शट डाऊन घेण्यात आलेले आहेत.