ठाणे : बँकेतून पैसे काढून पायी जाणा-या युवकाच्या अंगावर खाज येण्याचे औषध टाकून २ लाख ३३ हजार रुपये दोघांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी राम मारूती रोडवर घडली.कळवा येथील गावदेवी मैदानाजवळ असलेल्या कृपा अपार्टमेंटचा रहिवासी युवक स्टॅनली अँथोनी मुदालियर (२६) हा मंगळवारी दुपारी नौपाड्यातील राम मारूती रोडवरील गजानन महाराज चौकात असलेल्या आयसीआयसीआय बँकेमध्ये गेला होता. दुपारी दीड वाजताच्या सुमारास बँकेतून पैसे काढल्यानंतर ते पायी जात होते. कमल सोसायटीच्या गेटजवळ त्यांच्या अंगाला अचानक खाज सुरू झाली. खाज मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांनी सोसायटीजवळच्या एका दुकानाच्या पायरीवर थांबून तेथील बादलीतील पाणी अंगावर घेण्यास सुरूवात केली.तेवढ्यात दोन अनोळखी इसम तिथे आले. त्यापैकी एकाने त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यास मदत केली. त्यावेळी दुसºया इसमाने तुमचे पैसे खाली पडल्याचे मुदालियर यांना खोटे सांगितले. त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन मुदालियर खाली वाकले. तेवढ्यात पैशाची पिशवी घेऊन आरोपींनी पलायन केले.या पिशवीमध्ये मुदालियर आणि त्यांच्या वडिलांची महत्वाची कागदपत्रे तसेच दोघांचे क्रेडिट कार्डही होते. मुदालियर यांनी मंगळवारी सायंकाळी याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हणुमंत ओऊळकर करीत आहेत. याबाबत वारंवार प्रयत्न करूनही अशा फसवणुकीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही.
खाजेचे औषध टाकून २.३३ लाख लंपास, पैसे पडल्याचे खोटे सांगत घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:14 AM