ठाणे : गुरांचा तबेला आणि दुग्ध उत्पादनाच्या कामासाठी महाराष्ट्र दुग्ध उत्पादक सहकारी मंडळाने कोलशेत येथील सहा एकर सरकारी जागा ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतली होती. पण जमिनीवर अटी-शर्तींचा भंग करून अनधिकृत व्यावसायिक गाळे उभारून व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी ही जागा शासन जमा करण्याचे आदेश सोमवारी दिले. बाजारभावानुसार ही करोडो रुपयांची जागा शासन जमा होत असल्याने या मंडळाचे धाबे दणाणले आहेत.
या जागेसंबंधी प्राप्त तक्रारीस अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी यांना कळवले असता, त्यांनी अटी-शर्तींचा भंग झाला असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार यांच्याकडून अहवाल घेऊन सुनावणी घेण्यात आली. त्यात शासनाच्या अटी-शर्तींचा भंग झाल्याचे सोसायटीने मान्य केले. त्यासाठी सोसायटीला दोषी न धरता ज्या सदस्यांनी हव्यासापोटी हे काम केले, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोसायटीचे म्हणणे होते, असे ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले. पण ज्यांनी या अटी-शर्तींचा भंग केला त्या सदस्यांचे सदस्यत्व सोसायटीने रद्द केल्याचे दिसून आले नाही. याशिवाय या अनधिकृत कामांची माहिती जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे यास सोसायटीला जबाबदार धरून सहा एकर जागा शासन जमा करण्याचे आदेश जारी केले असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या जागेसाठी येथील जनशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील यांनी तक्रार देऊन पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र दुग्ध उत्पादक सहकारी मंडळास कोलशेत येथील सर्व्हे क्रमांक २९१/१ मधील २ हेक्टर ६४ आर एवढे क्षेत्र गुरांचा तबेला आणि दुग्ध उत्पादनासाठी डिसेंबर १९९३ मध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. ही जागा देताना ठाणे जिल्हाधिकारी यांनी काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. या अटी-शर्तींचा भंग महाराष्ट्र दुग्ध उत्पादक सहकारी मंडळाने केला आणि या जागेवर अनधिकृत बांधकामे करून गोडावून, दर्शनी भागात दुकाने, शोरूम, गॅरेजेस आणि सर्व्हिस सेंटर्स सुरू करून ती भाडेतत्त्वावर दिली आहेत. या जागेचा वापर हा केवळ गुरांचा तबेला आणि दुग्ध उत्पादन कार्यासाठीच करावयाचा आहे. पण या अटी-शर्तींचा भंग झाल्याप्रकरणी एसडीओ यांनी जागा शासन जमा करण्याचे आदेश सोसायटीला जारी केले आहेत. याशिवाय ठाणे तहसीलदारांनी नियोजन विभागाकडून निधी प्राप्त करून या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचेही आदेशात म्हटले आहे.
------