लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्याला नैसर्गिक पाण्याचे स्राेत लाभलेले आहेत. मुबलक पाण्याचे वैभव लाभलेल्या या जिल्ह्यातील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही १०७ गावे आणि २९४ पाडे आदी ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावपाड्यातील महिला डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत आहेत.
जागतिक दर्जाच्या बृहन्मुंबईच्या नगर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती आदी शहरांना या गावपाड्यांच्या शेजारील धरणांतून पाणीपुरवठा सुरू आहे. या गावकुसाला असलेल्या धरणातील पाण्याचा लाभ या गावपाड्यांच्या पाणीपुरवठ्याला तसेच शेती सिंचनासाठी मिळत नसल्याची खंत ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यंदाही ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यावर दरवर्षाप्रमाणे यंदाही ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या नियोजनाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.
मुंबईसह जिल्ह्यातील महानगरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात धन्यता मानणारे गावपाडे प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात असतात. त्यांच्या या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी रुपये खर्च होतात. मात्र, उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी झालेल्या दिसून येत नाहीत. यंदाही १०७ गावे २९४ पाडे आणि काेट्यवधी खर्चून तयार केलेल्या १३४ पाणीपुरवठा योजनांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेला तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे.
.......... पूरक जोड आहे.